भविष्यातील खर्चाचे संभाव्य धोके टाळण्यासाठी विमा संरक्षण घेणे हिताचे ठरते. त्याच प्रमाणे उद्योग धंद्यासाठी देखील विमा गरजेचा आहे. अनेकवेळा आग, अतिवृष्टी अथवा इतर कोणत्याही दुर्घटनेमुळे लहान मोठ्या दुकानांचे आर्थिक नुकसान होते. काही दुर्घटनांमध्ये जीवितहानीच्या घटना घडतात. याच पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व दुकाने आणि आस्थापनांसाठी विमा संरक्षण ( Shop insurance )अनिवार्य करण्याचा निर्णय राज्य शासनाकडून घेण्यात आला आहे.
कामगार मंत्रालयाकडून अधिसुचना जारी
अनेकवेळा प्रमुख बाजारपेठामंधील दुकानांना आग लागणे किंवा तत्सम दुर्दैवी घटना घडतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसानही होते. त्यामुळे यापुढे आता दुकांनासाठी विमा संरक्षण अनिवार्य करण्यात येणार आहे. या विम्याचे स्वरूप वाहनांच्या थर्ड पार्टी विमा संरक्षणाप्रमाणे असण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र राज्याच्या कामगार मंत्रालयाकडून महाराष्ट्र राज्य दुकाने आणि आस्थापना नियमांमध्ये या विमा अनिवार्य असल्याच्या नियमाचा समावेश करण्या संदर्भातील मसुद्याची अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
हरकती मागविल्या-
दुकानांसाठी विमा संरक्षण अनिवार्य करण्याच्या निर्णया संदर्भातील हरकती मागवण्यात आल्या असून यासाठी कामगार विभागाकडून 45 दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. हा नियम लागू झाल्यास अशा प्रकारे व्यावसायिक दुकानासांठी विमा संरक्षण अनिवार्य करणारे महाराष्ट्र राज्य हे प्रथम राज्य ठरणार आहे. दुकानाचा विमा (Shop insurance) काढल्यास विमा धारकास आग, भूकंप, स्फोट, नैसर्गिक संकटे आणि दंगलींमुळे नुकसान झाल्यास भरपाईचे संरक्षण मिळते.