National Pension Scheme-NPS: नोकरीला सुरूवात करून तुम्हाला 15 ते 20 वर्षे झाली असतील, तर तुम्ही आता रिटारमेंटचे प्लॅनिंग करायला काहीच हरकत नाही. आता लगेच निवृत्त होऊ नका. पण निवृत्तीचे नियोजन करण्याची हीच नेमकी वेळ आहे. आताच जर रिटायरमेंटचे प्लॅनिंग केले नाही तर उतारवयातदेखील काम करावे लागेल. तर आज आपण निवृत्तीसाठी कसे प्लॅनिंग करता येईल, हे पाहणार आहोत.
पूर्वीच्या काळी सरकारी आणि खाजगी कर्मचाऱ्यांना कंपनीकडून पेन्शन मिळत होती. पण आता कंपनीकडून पेन्शन देणे बंद करण्यात आले आहे. त्यामुळे आपल्या उतारवयातील खर्चाची तरतूद आपल्यालाच करावी लागते. त्यासाठी जराही वेळ न दवडता रिटायरमेंटसाठी योग्य गुंतवणूक केली पाहिजे. तर आज आपण रिटायरमेंटसाठी नॅशनल पेन्शन स्कीम कशी फायदेशीर ठरू शकते हे समजून घेणार आहोत.
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये प्रत्येक महिन्याला म्हणजेच एसआयपीप्रमाणे 5000 रुपये गुंतवा. एका वर्षातील तुमची गुंतवणूक 60 हजार रुपये होईल. ही गुंतवणूक जर सलग 30 वर्षासाठी सुरू ठेवली तर 18 लाख रुपयांची गुंतवणूक होईल. या गुंतवणुकीतून तुमचा एकूण 1.13 कोटी रुपयांचा फंड जमा होईल. यातील जवळपास 95 लाख रुपये तुम्हाला व्याजातूनच मिळतील. कारण एनपीएसमध्ये गुंतवणूक केलेल्या रकमेवर चक्रवाढ पद्धतीने व्याज (Compounding Interest) दिले जाते. जितके दिवस ही रक्कम त्या खात्यात जमा होईल, तितकी त्याची व्हॅल्यू वाढेल. आता या जमा झालेल्या फंडातून तुम्हाला प्रत्येक महिन्याला पेन्शन किती मिळेल हे आपण पाहू.
NPS Calculator
निवृत्तीनंतर NPS मधून पेन्शन किती मिळणार
नॅशनल पेन्शन स्कीममध्ये गुंतवलेले पैसे निवृत्तीनंतर मिळवण्याचे दोन पर्याय उपलब्ध आहेत. त्यातील पहिल्या पर्यायानुसार तुम्ही जमा झालेले सर्व पैसे एखाद्या वार्षिक प्लॅनमध्ये जमा करून त्यातून पेन्शन मिळवू शकता आणि दुसरा पर्याय म्हणजे या जमा झालेल्या एकूण रकमेपैकी 60 टक्के रक्कम काढून घ्या आणि उरलेली 40 टक्के रक्कम अॅन्युटी प्लॅनमध्ये जमा करा. रिटायरमेंटनंतर एनपीएसमधील किमान 40 टक्के रक्कम ही अॅन्युटी प्लॅनमध्ये टाकावी लागते. अॅन्युटी प्लॅनवर साधारण 10 टक्के रिटर्न मिळतात.
40 टक्के रकमेवर किती पेन्शन मिळू शकते?
एनपीएसमधी गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर जर एकूण 1.13 कोटी रुपयांचा फंड मिळत असेल. त्यातील 40 टक्के रक्कम अॅन्युटीमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला तर, साधारण 45.50 लाख रुपये तुम्ही वार्षिक योजनांमध्ये टाकू शकता. त्यावर तुम्हाला वर्षाला अंदाजे 7 ते 8 टक्के व्याज मिळेल. म्हणजेच 45.50 लाखावर 7 ते 8 टक्के व्याजदर पकडला तर प्रत्येक महिन्याला 26 ते 30 हजारांच्या दरम्यान पेन्शन मिळू शकते. एनपीएसमधील सर्व रक्कम जर वार्षिक योजनांमध्ये टाकली तर जवळपास 1.13 कोटींच्या रकमेवर प्रत्येक महिन्याला 65 ते 75 हजारांपर्यंत पेन्शन मिळू शकते. हे कॅल्क्युलेनश एका उदाहरणाच्या आधारे करण्यात आले आहे. तुमचे वय किंवा सर्व्हिस यापेक्षा कमी-जास्त असू शकते. त्यामुळे पेन्शनच्या रकमेतही बदल होऊ शकतो.