स्वस्त धान्य दुकान म्हणजेच रेशन दुकानात आता केवळ धान्यच मिळणार नसून बँकिग आणि वित्तीय सेवा देखील मिळणार आहेत. होय राज्यातील जवळपास 53 हजार शिधावाटप केंद्रावर येत्या काळात ही सेवा दिल जाणार आहे. या निर्णयाला नुकतीच राज्य सरकारने मान्यता दिली आहे. याद्वारे सामान्य नागरिकांना शिधावाटप केंद्रातच राष्ट्रीयीकृत तसेच खासगी बँकांच्या सर्व प्रकारच्या सेवांचा लाभ घेता येणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांसाठी खरे तर ही महत्वाची बातमी आहे. दुर्गम गावाखेड्यात अजूनही बँकिग सेवा पोहोचलेल्या नाहीत. नागरिकांना त्यांच्या छोट्याश्या कामासाठी देखील तालुक्याच्या गावी हेलपाटे मारावे लागतात. भारतीय पोस्ट खात्याने वित्तीय सेवा प्रादान केली असली तरी त्यासाठी देखील मर्यादा आहेत. मात्र आता थेट शिधावाटप दुकानामध्ये बँकिंग सेवा मिळणार असल्यामुळे दुर्गम भागातील नागरिकांची सोय होणार आहे.
शिधावाटप दुकानांना मिळेल चालना
राज्यभरातील शिधावाटप केंद्र सध्या आर्थिक कारणांमुळे अडचणीत आहेत. अन्नधान्य पुरवठा कमी झाल्यामुळे बहुतांश शिधावाटप केंद्र आता बंद होत चालली आहेत. अशातच या केंद्रांना नवसंजीवनी देण्यासाठी राज्य सरकारने हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
खरे तर 2019 मध्ये तत्कालीन राज्य सरकारने Yes बँकेसोबत एक करार केला होता. त्याद्वारे काही शिधावाटप केंद्रांना ‘व्यावसायिक प्रतिनिधी ‘ म्हणून नियुक्त करण्यात आले होते आणि कमिशन बेसिसवर त्यांना पैसे कमवता येत होते. परंतु कोविड संक्रमणामुळे ही सुविधा थांबवली गेली होती. तेव्हा 12 जिल्ह्यातील 20,000 रेशन दुकानांमध्ये बँकिग सुविधा देण्याचा निर्णय केला गेला होता. आता मात्र जवळपास 53 हजार शिधावाटप केंद्रावर ही सुविधा दिली जाणार आहे.
सेवेचा लाभ सर्वांसाठी
बँकिंग सुविधा केंद्र हे गावातील शिधावाटप केंद्रात जरू सुरु होणार असले तरी ज्यांच्याकडे शिधापत्र आहे त्यांना आणि ज्यांच्याकडे शिधापत्र नाही अशांना देखील या सुविधेचा लाभ घेता येणार आहे. शिधावाटप केंद्रात नागरिकांना वीजबिल, टेलिफोन, मोबाइल बिल भरण्यासह, DTH रिचार्ज, मनी ट्रान्सफर व अन्य ई-पेमेंट करता येणार आहे.
दुकान चालकाला दिले जाणार प्रशिक्षण
सरकारमान्य शिधावाटप दुकानांमध्येच ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. यासाठी शिधावाटप केंद्राच्या चालकाला बँकिंग व्यवहार कसे करावेत, काय काळजी घ्यावी, हिशोब कसा ठेवावा यासंबंधीचे तांत्रिक प्रशिक्षण दिले जाणार आहे.