Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ujani Dam Impact on Economy : पावसाअभावी उजनी धरण रिकामेच; सोलापूर जिल्ह्याचे अर्थकारण बिघडणार?

Ujani Dam Soapur

Image Source : www.sandrp.in

उजनी धरणाच्या माध्यमातून सोलापूर शहर पाणीपुरवठ्यासह, शेती आणि उद्योगासाठी पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: उजनी धरणावर अवलंबून आहे. तसेच साखर कारखानदारी, द्राक्ष-डाळींब फळबागायती शेती आणि औद्योगिक क्षेत्र या सर्वांसाठी उजनी धरण एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.

मान्सूनच्या पावसाचा भारताच्या अर्थव्यवस्थेवर मोठा परिणाम होतो. मान्सूनचा पाऊस चांगला झाल्यास कृषी उत्पादन क्षमता वाढते. मात्र, समाधानकारक पाऊस नाही झाल्यास त्यांचा परिणाम संपूर्ण अर्थव्यवस्थेवर होतो. दरम्यान, यंदाच्या वर्षी राज्यात आणि पश्चिम महाराष्ट्रात उशिराने दाखल झालेल्या मान्सूनमुळे धरणातील पाणीसाठ्यामध्ये म्हणावी तशी वाढ झाली नाही. त्याचप्रमाणे सोलापूर जिल्ह्यातील यशवंतसागर अर्थात उजनी (Ujani Dam) या धरणाचाही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी साखर उद्योग,द्राक्षे, डांळीब, ज्वारीच्या उत्पादनाक आघाडीवर असलेल्या सोलापूर जिल्ह्यासह आजूबाच्या तालुक्याचे अर्थकारण बिघडण्याची चिन्हे आहेत.

उजनी धरणाचा पाणीसाठा अल्पच

सोलापूर जिल्हा हा साखर उद्योगामध्ये अग्रेसर जिल्हा आहे. जिल्ह्याचे अर्थकारण साखर उद्योगाशी निगडीत आहे. मात्र, सद्यस्थितीत सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उजनी धरणाच्या पाणीसाठ्यावरून चिंता व्यक्त केली जात आहे. अर्धा पावसाळा संपून ऑगस्टचा पहिला पंधरवडा उलटला तरीही उजनी धरण अद्याप रिकामेच आहे.  गेल्यावर्षी 12 ऑगस्टला धरण 102 टक्के भरले होते. यंदा मात्र, आज अखेर उजनी धरणामध्ये केवळ 13 टक्के इतकाच पाणीसाठा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील धरणांचा पाणीसाठी अद्याप 83 टक्के आहे. ती धरणे भरल्यानंतरच उजनी धरणातील पाणीसाठ्यात वाढ होते.

उजनी धरणावर अर्थकारण-

उजनी धरणाची पाणी साठवण क्षमता ही 110 टीएमसी इतकी आहे. हे धरणाच्या पाण्यावर संपूर्ण सोलापूर जिल्ह्यासह,पुणे जिल्ह्यातील, इंदापूर, बारामती, नगरमधील कर्जत तसेच उस्मानाबाद जिल्ह्यातील काही तालुक्यांचे अर्थकारण अवलंबून आहे. उजनी धरणाच्या माध्यमातून सोलापूर शहर पाणीपुरवठ्यासह, शेती आणि उद्योगासाठी पाणी पुरवठा केला जातो. सोलापूर जिल्ह्यातील कृषी अर्थव्यवस्था पूर्णत: उजनी धरणावर अवलंबून आहे. तसेच साखर कारखानदारी, द्राक्ष-डाळींब फळबागायती शेती आणि औद्योगिक क्षेत्र या सर्वांसाठी उजनी धरण एकमेव पाण्याचा स्त्रोत आहे.  

शेतीसाठी किमान 70 टक्के पाणीसाठा आवश्यक

उजनी धरणावर शेती, उद्योग आणि पिण्याचा पाणी पुरवठा योजना अवलबून आहेत. धरणात किमान 70 टक्के पाणीसाठा असल्यास शेतीच्या पाण्याचे नियोजन करण्यात येते. मात्र सध्या धरणात केवळ 13 टक्केच पाणीसाठा आहे. त्यामुळे आगामी काळात धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून सुरू करण्यात आले आहे. तसेच पंढरपूर वारीसाठी देखील पाणी शिल्लक ठेवण्याची गरज आहे. आता उर्वरीत पावसाळ्यात समाधानक कारक पाऊस न झाल्यास शेतीसाठी पाणी मिळण्याची शक्यता कमीच आहे. याचा परिणाम कृषी उत्पन्नावर आणि उद्योगावर होणार आहे.

साखर उद्योग अडचणीत

यंदा पश्चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण कमी आहे. पुणे जिल्ह्यातही पाऊस झाला नसल्याने तेथील धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली नाही. परिणामी उजनी धरण अद्याप रिकामेच आहे.याचा परिणाम सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखानदारीवर होणार आहे. जिल्ह्यात सध्या 40 पेक्षा जास्त साखर कारखाने आहेत. साखर कारखाने हे जिल्ह्याच्या अर्थकारणाचे एक प्रमुख केंद्रबिंदू आहेत. मात्र, अत्यल्प झालेल्या पावसामुळे उसाच्या लागवडीचे क्षेत्र घटण्याची शक्यता आहे. तसेच उजनी धरण 70 टक्के भरल्याशिवाय शेतीसाठी पाणी सोडले जाणार नाही. त्यामुळे ऊस शेतीसह साखर उद्योग संकटात सापडण्याची शक्यता आहे.

शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार

उजनी धरणात अपेक्षित पाणीसाठा नाही झाल्यास आणि येत्या 15 दिवसात पुणे,अहमदनगर, उस्मानाबाद आणि सोलापूर जिल्ह्यात समाधान कारक पाऊस न झाल्यास या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडणार आहे. कारण या भागातील शेतकऱ्यांची शेती ही उजनी धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहे. मात्र, धरणात किमान पाणीसाठी न झाल्यास येथील प्रमुख पिके ऊस, डाळींब,द्राक्ष उत्पादनावर परिणाम होणार आहे. त्यासह रब्बी आणि उन्हाळी पिकेही घेता येणार नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बिघडण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. तरीही येत्या महिनाभरात समाधानकारक पाऊस पडून उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरेल अशी आशा आहे.