आयुर्विमा कंपन्यांच्या प्रीमियम संकलनात मे महिन्यात घसरण झाली आहे. मे 2023 मध्ये लाईफ इन्शुरन्समधून विमा कंपन्यांनी एकूण 23477.8 कोटींचा प्रीमियम कमावला. मात्र त्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 4.1% घसरण झाली. प्रीमियम कमी झाल्याने भारतीय आयुर्विमा महामंडळाची चिंता वाढली आहे.
लाईफ इन्शुरन्स कौन्सिलने विमा प्रीमियमची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार मे 2023 मध्ये विमा कंपन्यांनी आयुर्विमा विक्रीतून 23477.8 कोटींचा प्रीमियम संकलित केला. मे 2022 मध्ये प्रीमियमची रक्कम 24480.36 कोटी इतकी होती.
विमा प्रीमियममध्ये घसरण होण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एलआयसीच्या प्रीमियम संकलनात 11.26% घसरण झाली. एलआयसीने मे महिन्यात 14056.29 कोटींचा प्रीमियम मिळवला. मे 2022 मध्ये एलआयसीने लाईफ इन्शुरन्स प्रीमियममधून 15480.64 कोटींची कमाई केली होती.
एलआयसीला व्यावसायिकदृष्ट्या नवीन आर्थिक वर्ष वाईट ठरले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल आणि मे या पहिल्या दोन महिन्यात एलआयसीच्या एकूण व्यावसायात तब्बल 28% घसरण झाली आहे. एलआयसीने एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 19866 कोटींचा प्रीमियम संकलित केला. गेल्या वर्षी याच दोन महिन्यात एलआयसीने 27557 कोटींचा प्रीमियम संकलित केला होता.
एलआयसी वगळता विमा क्षेत्रातील 23 विमा कंपन्यांच्या सरासरी विमा प्रीमियममध्ये 9.05% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 विमा कंपन्यांनी मे महिन्यात एकूण 9421.51 कोटींचा विमा प्रीमियम कमावला आहे.
विमा क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी म्हणून एलआयसीची ओळख आहे. मात्र खासगी विमा कंपन्यांकडून देखील एलआयसीच्या तोडीची विमा उत्पादने बाजारात दाखल केली जात आहेत. त्यामुळे स्पर्धा वाढली आहे. ग्राहकांना गरजेनुसार एकाच वेळी अनेक पर्याय उपलब्ध होत आहेत.
एप्रिल-मे महिन्यातील एकूण व्यवसायाला बसला फटका
एप्रिल आणि मे महिन्यात एलआयसीसह सर्वच विमा कंपन्यांच्या व्यवसायाला फटका बसला आहे. 24 विमा कंपन्यांच्या प्रीमियममधून मिळणाऱ्या उत्पन्नात 15% घसरण झाली. या 24 विमा कंपन्यांनी एकूण 36043.11 कोटींचे उत्पन्न मिळवले. मात्र गेल्या वर्षी 2022 मधील एप्रिल आणि मे या दोन महिन्यात विमा कंपन्यांनी 42419.97 कोटींचे प्रीमियम उत्पन्न मिळवले होते.