LIC ही देशातली सर्वात मोठी विमा कंपनी आहे. आज सकाळी या कंपनीच्या शेअर्समध्ये अर्ध्या टक्क्याची घसरण पाहायला मिळाली. या घसरणीनं साऱ्यांनाच चकीत केलं. मात्र यामागचं कारण ऐकाल तर हैराण व्हाल. बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्यांनी LIC ला चक्क 290 कोटींची नोटीस पाठवली आहे.या नोटीशीत एलआयसीला व्याज आणि दंडाची रक्कम एकत्र भरण्यास सांगितलं गेलं आहे. याचा परिणाम बाजारावर पाहायला मिळाला आणि एलआयसीच्या शेअर्समध्ये 0.57 घसरण पाहायला मिळाली. सध्या एलआयसी 648.50 वर ट्रेड होत आहे.
एलआयसीने काय केला खुलासा?
याबाबत एलआयसीकडूनही खुलासा करण्यात आला आहे. बिहारच्या टॅक्स अधिकाऱ्यांनी आम्हाला व्याज आणि दंडाच्या रकमेसह जीएसटी भरण्यास सांगितलं आहे. यातल्या फक्त जीएसटीची रक्कमच 166.75 कोटी इतकी आहे. यात व्याजाची रक्कम 107.05 इतकी आहे आणि दंडाची रक्कम 16.67 कोटी रुपये इतकी आहे. ही सर्व रक्कम 290 कोटी रुपये आहे. एलआयसीच्या म्हणण्यानुसार ते हे प्रकरण जीएसटी अपीलेट ट्रिब्युनलमध्ये घेऊन जाणार आहे.
एलआयसीला नोटीस मिळण्यामागचं नेमकं कारण काय?
याबाबतही एलआयसीने एक्सचेंज फायलिंगमध्ये एक खुलासा केला आहे. टॅक्स अधिकाऱ्यांच्या म्हणण्याप्रमाणे एलआयसीच्या पॉलिसी होल्डर्सकडून कंपनीला जी रक्कम प्रिमियमच्या रुपात मिळाली आहे,त्याचं इनपुट टॅक्स क्रेडीट एलआयसीने भरलेलं नाही आणि कायद्यानुसार हा गुन्हा आहे.याशिवायही एलआयसीने त्यांच्या एजंटकडून मिळालेल्या कमिशनवरही इनपुट टॅक्स क्रेडीट भरलेलं नाही,हेही कायद्याचं उल्लंघन असल्याचं टॅक्स अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.