देशातील सर्वात मोठी जीवन विमा कंपनी लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (LIC) ने मार्च तिमाहीचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत. 2021-22 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीत (LIC Q4 results) (जानेवारी ते मार्च ) कंपनीच्या नफ्यात घट झाली आहे. शेअर बाजारात लिस्ट झाल्यानंतर कंपनीनेने प्रथमच निकाल जाहीर केला आहे. एलआयसीने (LIC) आपल्या शेअरधारकांना लाभांश देण्याची घोषणा केली आहे.
एलआयसीच्या नफ्यात घट
एलआयसीच्या (LIC) स्टॉक एक्सचेंजला दिलेल्या माहितीनुसार मार्च तिमाहीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा 17 टक्के घसरून 2409 कोटींवर आला आहे. मार्च 2021 मध्ये कंपनीचा एकत्रित नफा 2917.33 कोटी रुपये होता. एकल आधारावर कंपनीचा निव्वळ नफा 18 टक्क्यांनी कमी झाला आहे. मार्च 2022 च्या तिमाहीत तो 2372 कोटी होता. आर्थिक वर्ष 2021-22 च्या शेवटच्या तिमाहीत प्रीमियम उत्पन्न 18 टक्क्यांनी वाढून 1.44 लाख कोटी झाले आहे. वर्षभरापूर्वी हेच उत्पन्न 1.22 लाख कोटी होते.
गुंतवणुकदारांना मिळणार 1.05 लाभांश
या विमा कंपनीने आपल्या गुंतवणूकदारांना प्रति शेअर 10 रुपये दर्शनी मूल्याने 1.05 लाभांश देण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीच्या बोर्डाने या निर्णयाला मंजुरी दिली आहे. आता बोर्डाच्या निर्णयाला शेअरधारकांची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. सोमवारी एलआयसी (LIC) कंपनीचा शेअर बीएसई वर 1.89 टक्क्यांनी वाढून 837.05 रुपयांवर बंद झाला. एलआयसीचा (LIC) शेअर आतापर्यंतच्या आयपीओच्या इश्यु किमतीपासून 15 टक्क्यांनी घसरला होता. त्याचे लिस्टिंग 17 मे रोजी झाले होते. हा आयपीओ देशातील सर्वात मोठा इश्यु होता. सरकारने या कंपनीतील 3.5 टक्के हिस्सा विकून 21 हजार कोटी रुपये उभारले होते.