भारतीय आयुर्विमा महामंडळाने (LIC) आधारस्तंभ ही आयुर्विमा पॉलिसी जाहीर केली आहे. या विमा योजनेत पॉलिसीधारकाला विमा सुरक्षा आणि बचतीतून संपत्ती निर्माण करता येईल. या योजनेत दरवर्षी 10000 रुपयांनी किमान 15 वर्ष प्रीमियम भरला तर मॅच्युरिटीला किमान 3 लाख रुपयांचा निधी मिळण्याची शक्यता आहे.
एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी (LIC AADHAAR STAMBH POLICY) ही नॉनलिंक्ड वैयक्तिक आयुर्विमा बचत योजना आहे. यातून पॉलिसीधारकाला विमा सुरक्षेसोबत बचत करता येणार आहे. भविष्यातील आर्थिक गरजा पूर्ण करण्याच्यादृष्टीने हा इन्शुरन्स प्लॅन तयार करण्यात आला आहे.
एलआयसी आधारस्तंभ पॉलिसीमध्ये किमान 8 वर्ष ते जास्तीत जास्त 55 वर्षांची व्यक्ती सहभागी होऊ शकते. या योजनेत कर्ज सुविधा देखील आहे. जितकी वर्ष प्रिमियम भरला असेल त्यानुसार कर्ज दिले जाते. मात्र किमान 3 वर्ष प्रीमियम भरणे आवश्यक आहे.
ही एंडॉवमेंट पॉलिसी असल्याने मुदतपूर्तीला पॉलिसीधारकाला एक ठराविक रक्कम मिळते. ज्यात सम अॅश्युअर्ड आणि बोनस यांचा समावेश असतो. एलआयसी आधारस्तंभ पॉलिसी किमान 75000 रुपयांपासून 300000 रुपये इतकी सम अॅश्युअर्ड इतकी आहे.
एलआयसीला व्यावसायिकदृष्ट्या नवीन आर्थिक वर्ष वाईट ठरले आहे. आर्थिक वर्ष 2023-24 मधील एप्रिल आणि मे या पहिल्या दोन महिन्यात एलआयसीच्या एकूण व्यावसायात तब्बल 28% घसरण झाली आहे. एलआयसीने एप्रिल आणि मे या दोन महिन्यात 19866 कोटींचा प्रीमियम संकलित केला. गेल्या वर्षी याच दोन महिन्यात एलआयसीने 27557 कोटींचा प्रीमियम संकलित केला होता.
एलआयसी वगळता विमा क्षेत्रातील 23 विमा कंपन्यांच्या सरासरी विमा प्रीमियममध्ये 9.05% वाढ झाल्याचे दिसून आले आहे. 23 विमा कंपन्यांनी मे महिन्यात एकूण 9421.51 कोटींचा विमा प्रीमियम कमावला आहे.
विमा प्रीमियममध्ये घसरण होण्यात भारतीय आयुर्विमा महामंडळाला मोठा फटका बसला आहे. एलआयसीच्या प्रीमियम संकलनात 11.26% घसरण झाली. एलआयसीने मे महिन्यात 14056.29 कोटींचा प्रीमियम मिळवला. मे 2022 मध्ये एलआयसीने लाईफ इन्शुरन्स प्रीमियममधून 15480.64 कोटींची कमाई केली होती.