अभियांत्रिकी उद्योजकातील लार्सन अॅंड टुब्रोने पहिल्यांदाच शेअर बायबॅक करण्याची घोषणा केली आहे. (Larsen & Toubro announce buyback) कंपनी 3000 रुपये प्रति शेअर या प्रमाणे 10 हजार कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार आहे. आजच्या सत्रात 'एल अॅंड टी'चा शेअर 2561.95 रुपयांवर बंद झाला.
'एल अॅंड टी' शेअर मार्केटमध्ये लिस्ट झाल्यानंतर पहिल्यांदाच शेअर बायबॅक करणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्सुकतेचे वातावरण आहे. सध्यातरी 10000 कोटींचे शेअर पुनर्खरेदी करणार असली तर त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
'एल अॅंड टी'कडून 2 रुपये दर्शनी मूल्य असलेल्या 3.33 कोटी शेअरची टेंडर ऑफरमधून पुनर्खरेदी करणार आहे. पेडअप कॅपिटलमध्ये हे प्रमाण 2.4% इतके आहे. यात 3000 रुपयांनी शेअरची पुनर्खरेदी केली जाणार आहे. बाजार भावापेक्षा कंपनी 17% जादा दराने शेअर बायबॅक करणार आहे.
कंपनीकडून रोखीने शेअर बायबॅक केला जाणार आहे. शेअर बायबॅकमुळे बाजारातील 'एल अॅंड टी'च्या शेअरची तरलता कमी होणार आहे. यामुळे नजीकच्या काळात शेअरचा भाव वाढण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे.
पहिल्या तिमाही नफा वाढला
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 'एल अॅंड टी'ला 2 हजार 493 कोटींचा नफा झाला. त्यात 46% वाढ झाली. याच तिमाहीत कंपनीला 47 हजार 882 कोटींचा महसूल मिळाला. कंपनीला पहिल्या तिमाहीत 65 हजार 520 कोटींची कंत्राटे मिळाली. यात पायाभूत सेवा क्षेत्रातील कंत्राटांमधून कंपनीला 22 हजार 58 कोटींचा महसूल मिळाला. यात 56% वाढ झाली. यंदा महसुलात 34% वाढ झाली. कंपनीने तिमाहीत मिळालेल्या नफ्यानंतर प्रति शेअर 6 रुपये लाभांश जाहीर केला आहे.