यंदाचा गणेशोत्सव तोंडावर आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील गणेशोत्सव मंडळाकडून उत्सावाची जय्यत तयारी सुरू करण्यात आली आहे. मुंबईतील महत्त्वाच्या गणेश मंडळाकडून गणेशाच्या आगमनाची तयारी पूर्ण झाली आहे. तसेच गणेशोत्सव मंडळांनी संभाव्य आपत्कालीन परिस्थितीमधील जोखीम लक्षात घेत विमा संरक्षणही घेतले आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध असलेल्या लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) या गणेश मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल 26.54 कोटी रुपयांचा विमा संरक्षण (insurance cover) घेतले आहे.
23 ऑक्टोबर पर्यंत वैध
यंदाचा गणेशोत्सव 19 सप्टेंबर पासून सुरू होणार आहे. मुंबईतील लालबागचा राजा या गणपतीच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत येत असतात. दरम्यान, यंदाच्या वर्षी मंडळाने गणेशोत्सवासाठी न्यू इंडिया अॅश्युरन्स या कंपनीकडून एकूण 26.54 कोटी रुपयांचा विमा काढला आहे. यामध्ये मंडळाने दहशतवादी घटना, आगीची घटना, चोरी, अपघात यासह चेंगराचेंगरी आणि प्रसादातून होणारी विषबाधा या जोखमींसाठी विमा संरक्षण (insurance cover) घेतले आहे. मंडळाने घेतलेला हा विमा 23 ऑक्टोबर पर्यंत वैध राहणार असल्याची माहिती मंडळाचे खजिनदार मंगेश दळवी यांनी दिली आहे.
12 कोटींचा वैयक्तिक अपघात विमा
मंडळाने घेतलेल्या 26 लाखांच्या विमा संरक्षणामध्ये 12 कोटी रुपयांचे विमा हा गणपतीच्या दर्शनासाठी येणारे भक्त, मंडळाचे विश्वस्त, मंडळाचे पदाधिकारी आणि स्वयंसेवक, यासह सुरक्षा कर्मचारी आणि वॉचमन यांचा वैयक्तिक अपघात विमा संरक्षण म्हणून घेण्यात आले आहे. या संरक्षणातंर्गत गणेशोत्सवकाळा दरम्यान, जर एखादी दुर्घटना घडल्यास मृत व्यक्तीच्या वारसांना 5 लाख रुपयांपर्यंत नुकसान भरपाई दिली जाणार आहे.
भाविकांसाठी देखील विमा संरक्षण-
तसेच मंडळाने दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी 5 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे. जर आलेल्या भाविकांना प्रसादातून विषबाधा होऊन नुकसान झाल्यास त्यांना या नुकसान भरपाई देण्याची तरतूद करण्यात आली आहे. तसेच इतर नुकसानीसाठी  2.5 कोटी, दागिने आणि मौल्यवान वस्तूंसाठी 7.04 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेण्यात आले आहे. या संपूर्ण विमा संक्षणासाठी मंडळाने एकूण 5.4 लाख रुपयांचा प्रिमियम भरला आहे. 
दरम्यान, मुंबईतील सर्वात श्रीमंत असलेल्या GSB गणेशोत्सव मंडळाने या वर्षीच्या गणेशोत्सवासाठी तब्बल 360 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेतले आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            