दावत बासमती तांदुळाचा ब्रांड तुम्हाला माहितीच असेल. दावत बासमती विकणारी कंपनी एलटी फूड्सने आपल्या इन्हेस्टर्सना आनंदाची बातमी दिली आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टर्सना एलटी फूड्सने खूप मोठा परतावा दिला आहे. २०१३ सालीएलटी फूडसचा एक शेअर सात रुपये किमतीने विकला जात होता. आज बरोब्बर दहा वर्षांनी या शेअरची किंमत 163 रुपये झाली आहे. त्यामुळे या शेअरमध्ये गुंतवणूक केलेल्यांना या तांदुळाने नफ्याच्या रुपाने दरवळून टाकलं आहे.
गेल्या शुक्रवारी मात्र या शेअरच्या दरात 2.61 टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली होती आणि शुक्रवारी हा शेअर 158.30 रुपयांवर बंद झाला होता. आज मात्र या शेअरने पुन्हा उसळी घेतलेली पाहायला मिळाली आहे. या स्टॉकचा गेल्या 52 आठवड्यातला उच्चांक 194.10 होता तर गेल्या 52 आठवड्यातला निचांक 90 रुपये असल्याचं पाहायला मिळालं आहे.स्टॉक एक्स्चेंजकडून मिळालेल्या माहितीनुसार प्रमोटर्सकडे या कंपनीची 51 टक्के हिस्सेदारी आहे, पब्लिक शेअरहोल्डर्सकडे 49 टक्के, पब्लिक शेअर होल्डर्समधल्या म्युच्युअल फंडाकडे 2.84 टक्के हिस्सेदारी आहे आणि परदेशी गुंतवणूकदारांकडे 5.93 टक्के आहे.
शेअरने दिला 10 वर्षात 2300 टक्क्याचा घसघशीत परतावा
मल्टीबॅगर स्टॉक म्हणून एलटी फूडसकडे पाहिलं जात आहे. याचं मुळातच कारण की लाँग टर्म इन्व्हेस्टर्सना मिळालेला तब्बल 2300 टक्क्यांचा परतावा. 20 सप्टेंबर 2013 रोजी या शेअरची किंमत 6.79 पैसे प्रती शेअर होती आणि आज हा शेअर 163 रुपयांचा झाला आहे. गेल्या पाच वर्षात या शेअरमध्ये 260 टक्के उसळण पाहायला मिळाली आहे. गेल्यावर्षी या शेअरमध्ये 51 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली होती.
कंपनीला आणखीन मजबूत कारभाराची अपेक्षा
ज्याप्रमाणे एलटी फूडसचे इन्व्हेस्टर्स इतका चांगला नफा मिळाल्याने आनंदात आहेत त्याचप्रमाणे कंपनीचे सीईओ आणि एमडी अश्विनी कुमार अरोरा यांनाही कंपनी आगामी पाच वर्षात याच सेगमेंटमध्ये 8 ते 10 टक्के महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.चालू तिमाहीमध्ये कंपनीचा मार्केट शेअर 29.8 टक्के झाला आहे.