जेव्हा तुम्ही बँकेत तुमचे खाते उघडता तेव्हा तुम्हाला तुमचे ओळखपत्र, पत्त्याचा पुरावा, पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड यासारखी सर्व आवश्यक कागदपत्रे जमा करावी लागतात. केवायसी म्हणून सबमिट केलेली ही कागदपत्रे तुमच्या ओळखीची पुष्टी करण्यासाठी आहेत. पण अनेकवेळा बँक पुन्हा केवायसी अपडेट (KYC Update) करायला सांगते, तेव्हा अनेक प्रश्न मनात येतात. जर तुमच्या बाबतीतही असेच होत असेल, तर जाणून घेऊया की, बँक कोणत्या परिस्थितीत तुम्हाला पुन्हा केवायसी तपशील मागू शकते? याबाबत काय नियम आहेत?
...तर बँक पुन्हा केवायसी कागदपत्रे मागू शकते
खाते उघडताना तुम्ही आधार कार्ड, पॅन कार्ड, मतदार ओळखपत्र किंवा असे कोणतेही महत्त्वाचे दस्तऐवज सादर केले नसेल, ज्याचा सध्याच्या वैध कागदपत्रांच्या यादीमध्ये समावेश असेल, तर बँक तुमच्याकडून नवीन केवायसी (KYC) कागदपत्रे मागू शकते. याशिवाय, जर तुम्ही केवायसी म्हणून सबमिट केलेल्या कागदपत्रांची वैधता कालबाह्य झाली असेल, तर या स्थितीत बँक तुमच्याकडून नवीन केवायसी कागदपत्रे मागू शकते.
... तर कागदपत्रे सादर करण्याची आवश्यकता नाही
जर तुम्ही तुमची सर्व कागदपत्रे बँकेत जमा केली असतील आणि सर्व कागदपत्रे वैध असतील, त्यात कोणताही बदल नसेल, तर तुम्हाला ती कागदपत्रे पुन्हा जमा करण्याची गरज नाही. केवायसी प्रक्रिया पुन्हा पूर्ण करण्यासाठी तुमचे सेल्फ डिक्लरेशन पुरेसे आहे. तुम्ही ईमेल, नोंदणीकृत मोबाइल क्रमांक, एटीएम किंवा नेटबँकिंगद्वारे सेल्फ डिक्लरेशन देऊ शकता. जर तुमचा पत्ता बदलला असेल आणि इतर सर्व तपशील पूर्वीप्रमाणेच असतील, तर तुम्ही बँकेच्या शाखेत किंवा ऑनलाइन जाऊन तुमचा नवीन पत्ता पुरावा अपडेट करू शकता.
केवायसी अपडेट करणेही सोपे झाले
तुमच्या बँकेने तुम्हाला कोणत्याही कारणास्तव केवायसी अपडेट करण्यास सांगितले तर ते तुमच्या सुरक्षिततेसाठी आहे, त्यामुळे याला ओझे समजू नका. आता रिझर्व्ह बँकेनेही केवायसी अपडेट करणे खूप सोपे केले आहे. जर तुमची बँक व्हिडिओ केवायसी (Video Customer Identification Process) ची सुविधा देत असेल, तर तुम्ही हे काम कोठूनही सहज करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत जाण्याची गरज नाही.