किरकोळ महागाईचा दर 7 टक्क्यांच्या दरम्यान असताना बँकांकडून मुदत ठेवींवर देण्यात येणारा व्याजदर अत्यंत कमी होता. मात्र, आता बँकांनी एफडीचे दर वाढवण्यास सुरुवात केली आहे. मागील आठवड्यात गुरुवारी कोटक बँकेने (Kotak Bank FD rates) सलग तिसऱ्यांदा एफडीवरील व्याजदर वाढवला आहे. 390 दिवस ते 23 महिन्यांपर्यंत एफडीवर २५ बेसिस पाँइट दरवाढ केली आहे. यामध्ये भविष्यात आणखी वाढ होईल, असे सुतोवाच बँकेने केले आहे.
ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवीवर 7.5 टक्के व्याजदर
नुकतेच केलेल्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्य नागरिकांना 2 कोटींपेक्षा कमी ठेवींवर 7 टक्क्यांपर्यंत व्याज देण्यात येईल. तर ज्येष्ठ नागरिकांच्या ठेवींवर 7.5 टक्के व्याजदर देण्यात येत आहे. रिझर्व्ह बँकेने रेपो दरात बदल केल्यानंतर तसेच बाजारपेठेतील स्पर्धा पाहून हा निर्णय घेण्यात आल्याचे कोटक बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले. मुदत ठेवी वाढविण्यासाठी बँकांमध्ये तीव्र स्पर्धा निर्माण झाली आहे. दरम्यान, बाजारातील पैशाची तरलता कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने रेपो दरात वाढ केली आहे.
एफडी व्याजदरात वाढ
गेल्या काही दिवसांपासून एफडीवरील दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे. यामुळे गुंतवणूकदारांना संधी उपलब्ध होत आहेत. स्टेट बँक इंडियानेही एफडी दरामध्ये वाढ केली आहे. यापूर्वी यूको बँकेनेही एफडी दरात वाढ केली होती. गेल्या काही वर्षांचा विचार केला तर एफडी दरांमध्ये घट होत आहे. यामुळे सुरक्षित परताव्याच्या दृष्टीने विचार करणाऱ्या गुंतवणूकदारांमध्ये यात गुंतवणूक करण्याचा तुलनेने कमी उत्साह होता. मात्र आता दरांमध्ये वाढ होताना दिसत आहे.
स्मॉल फायनान्स बँकाही अधिक व्याजदर ग्राहकांना ऑफर करताना दिसत आहेत. रिझर्व्ह बँकेने महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रेपो दरात नुकतीच वाढ केली. यानंतर बँकांची कर्जे महाग होऊ लागली आहेत. दुसरीकडे एफडी (मुदत ठेव) मधील दरांमध्ये बँका वाढ करताना दिसत आहेत. यामुळे गुंतवणूकदारांना अधिक व्याज मिळवता येणार आहे. महागाईचा दर सात टक्क्यांच्या आसपास असताना एफडीवर सुरुवातीला फक्त 3 ते 4 टक्के व्याज मिळत असे. त्यामुळे खरे तर बँकेतील पैशांचे मूल्य एका अर्थाने कमीच होत होते. मात्र, आता एफडीच्या दरात वाढ होत आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            