• 28 Nov, 2022 13:18

एकर, हेक्टर, गुंठा म्हणजे नेमकं काय?

Land Measurement

भारतात जमीन मोजण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. प्रत्येक प्रदेशात त्याची वेगवेगळी नावे आहेत. महाराष्ट्राचंच उदाहरण घेतलं तर इथे जमीन मोजण्यासाठी एकर, हेक्टर, गुंठा, चौरस फूट या मापकांचा वापर केला जातो.

जमीन मोजणीसाठी जगभरात विविध मोजणी पद्धती प्रचलित आहेत. इंग्रजांनी (British) जगभरात राज्य केल्याने त्यांची जमीन मोजणीची साधनं आणि मापक प्रचलनात आहे. भू-मोजमापांसाठी भारतातही अनेक एकक वापरले जातात. विविधतेत एकता असणाऱ्या भारतात जमीन मोजण्याच्या उत्तर-दक्षिण, पूर्व-पश्चिम पद्धतीत फरक आहे. त्याला विविध नावे आहेत. तुम्ही त्या प्रदेशात जाऊन जमीन खरेदी करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला हा फरक लक्षात येईल.

काय आहेत स्थानिक भाषेतील मापकांची नावं!

जमीन मोजताना अनेक एकक वापरण्यात येतात. त्यात चौरस फूट (Square Foot), चौरस मीटर (Square Meter), एकर (Acre), हेक्टर (Hector), गुंठा (Guntha) या सर्वमान्य पद्धतींचा वापर करण्यात येतो. पण तुम्ही पूर्व भारतात गेला तर तिथे धूर, कट्टा, चतक अशी स्थानिक लोकप्रिय मापक वापरतात. धूर हे उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड आणि त्रिपुरा येथे वापरण्यात येते. तर कट्टा हे आसाम, बिहार, झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वापरतात. तर चतक ही पद्धत पूर्व-पश्चिम बंगालमध्ये लोकप्रिय आहे. 

बिघा, बिस्वा हे शब्द तुम्ही हिंदी चित्रपटात हमखास ऐकले असतील. ‘दो बिघा जमीन’ हा तर जुन्या चित्रपटातील प्रसिद्ध डायलॉग आहे. बिघा हे उत्तर भारतातील एक गणक मापक आहे. यासोबतच उत्तर भारतात गज, बिस्वा, किल्ला, कानल, घुमाव सरसाई, मारला अशी परिमाणं वापरली जातात. तर दक्षिण भारतात गुंठा, अंकनम, कुंचम, ग्राऊंड, शतक ही परिमाणं वापरली जातात.


एकर, हेक्टर आणि गुंठ्यात काय फरक आहे?

1 एकर म्हणजे 40 गुंठे जमीन मानली जाते. आता 1 गुंठा म्हणजे 33 फूट बाय 33 फूट जमीन. असे 40 गुंठे झाले की, 1 एकर पूर्ण होतो. फूटांमध्ये सांगायचं झालं तर 1 एकर म्हणजे 43,560 चौरस फूट जमीन.

1 हेक्टर (Hector) म्हणजे 10,000 चौरस मीटर (Square Meter). तर एक मीटर बाय एक मीटरने एक चौरस तयार होतो. अशा दहा हजार चौरस मीटरने मिळून एक हेक्टर तयार होतो. सातबारामध्ये हेक्टर आणि चौरस मीटर असे दोन्ही शब्द पहायला मिळतात.

महाराष्ट्र आणि आंध्रप्रदेशात जमीन मोजण्यासाठी गुंठा (Guntha) याचा सर्वाधिक वापर होतो. इंग्रजांनी देशात कारभार सांभाळायला सुरुवात केल्यावर त्यांनी सर्वात आधी आपला भारत उभा, आडवा मोजला. त्यासाठी गुण्टर (Gunter) या अधिकाऱ्याने मोलाची कामगिरी बजावली. त्याच्या नेतृत्वात हे काम झाले. त्याने मोजणीसाठी 33 फूट लांबीची साखळी वापरली. या 33 बाय 33 फूट चैनचं गुण्टर चैन असं नामकरण झालं. कालांतराने ही गुण्टर चैनच पुढे गुंठा म्हणून लोकप्रिय झाली. तर एक गुंठा म्हणजे 33 फूट बाय 33 फूट जमीन. 

मेट्रिकचे एकक 'हेक्टर'

फ्रान्समध्ये मेट्रिक पद्धत प्रचलित आली. हा काळ साधारणता 1800 शतकातील होता. विश्वकोशमध्ये दिलेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 1840 मध्ये जमीन मोजणीसाठी मेट्रिक पद्धत प्रचलित करण्यात आली. मेट्रिक पद्धतीत क्षेत्रफळाचे एकक हेक्टर (Hector) आहे. ते 10,000 चौरस मीटर इतके आहे. तर एक हेक्टर हे 2.47 एकर क्षेत्रफळ असते.

मापके एका टप्प्यात समजून घेऊयात…

1 आर = 1076.39  चौरस फूट

1 गुंठा = 33 फूट बाय 33 फूट = 1089 चौरस फूट

1 एकर = 40 गुंठे X (33X33) = 43,560 चौरस फूट

1 हेक्टर = 100 आर म्हणजेच 100 गुंठे

1 हेक्टर = 2.47 एकर  = 2.47X40=98.8 गुंठे

1 चौरस मीटर  = 10.76 चौरस फूट