गुंतवणुकीचा पर्याय म्हणून अनेक जण आता शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत आहेत. तसेच आताची तरुणाई सोशल मीडियावरही शेअर मार्केटमध्ये होणाऱ्या नफ्या तोट्याच्या गोष्टी शेअर करत आहे. यामध्ये काही वेळा आपला अप्पर सर्किट (upper circuit) आणि लोअर सर्किट (lower circuit)या शब्दांशी संपर्क येतो. मात्र अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे नेमके काय? याचे शेअर बाजारात काय महत्व आहे, हे आज आपण जाणून घेऊयात..
शेअर बाजारातील निर्देशांकाची हालचाल पाहिली असता आपल्याला लगेच लक्षात येते की यामध्ये खुप जोखीम आहे. एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत अपेक्षापेक्षा जास्त वधारते अथवा घसरते. मात्र, अशा प्रकारे एखाद्या स्टॉकच्या प्रमाणाबाहेर होणाऱ्या वाढीमुळे अथवा घसरणीमुळे बाजार अस्थिर होऊ नये म्हणून एक मर्यादा निश्चित केली जाते. त्यालाच शेअर मार्केटमध्ये अप्पर सर्किट किंवा लोअर सर्किट म्हटले जाते. शेअर बाजारातील स्थिरता वाढवण्यासाठी सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) द्वारे सर्किट फिल्टर लावले जातात.
अप्पर सर्किट म्हणजे काय?
ट्रेडिंगमध्ये एखाद्यावेळी एखाद्या कंपनीच्या स्टॉकच्या किमतीमध्ये अचानक झपाट्याने वाढ होते. अशा वेळी त्या शेअरच्या किंमत वाढीवर एक मर्यादा निश्चित केली जाते. त्यालाच अप्पर सर्किट म्हणततात. शेअरची किंमत निश्चित करण्यात आलेल्या मर्यादेपर्यंत पोहोचल्यानंतर त्या शेअरचे ट्रेडिंग काही काळासाठी स्थगित केले जातात. गुंतवणूकदारांना वाढत्या किमतीने शेअर खरेदी करण्यापासून रोखण्यासाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.
लोअर सर्किट म्हणजे काय?
लोअर सर्किट म्हणजे अप्पर सर्किटच्या अगदी उलट प्रक्रिया आहे. यामध्ये एखाद्या कंपनीचा शेअर झपाट्याने पडायला सुरुवात होते. त्यावेळी गुंतवणूकदार सातत्याने शेअर्सची विक्री करायला सुरुवात करतात. अशा परिस्थितीत एखादा शेअर जेव्हा निश्चित केलेल्या मर्यादेपर्यंत घसरतात. त्यावेळी त्या शेअर्सचे ट्रेंडिग काही काळासाठी बंद केले जातात त्यास लोअर सर्किट म्हटले जाते. या सर्किटच्या माध्यमातून गुंतवणूकदारांना सतत घसरणाऱ्या किमतींवर स्टॉक विकण्यापासून रोखले जाते.
अप्पर आणि लोअर सर्किट हे प्रत्येक स्टॉकच्या शेवटच्या ट्रेड केलेल्या किमतीवर आधारित सेट केले जातात. यामाध्यमातून ट्रेडिंग करत असताना अचानक होणारी कमालीची वाढ आणि घसरण यामुळे गुंतवणूकदारांचे नुकसान टाळून संरक्षण केले जाते. काही वेळा शेअर बाजारावर प्रभाव टाकणाऱ्या ब्रेकिंग बातम्या, किंवा घटनांमुळे शेअरच्या किमतीमध्ये अनपेक्षित चढउतार दिसून येतो. अशा काळात गुंतवणूकदार घाईघाईत निर्णय घेण्याची शक्यता असते. परिणामी मार्केटमध्ये फुगवटा निर्माण होण्याची अथवा मार्केट कोसळण्याची परिस्थिती निर्माण होते. हे धोके टाळण्यासाठी सेबीकडून शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट सारख्या यंत्रणा कार्यान्वित करण्यात आल्या आहेत.