कोणत्याही प्रकारची नैसर्गिक आपत्ती होऊन नुकसान झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडून पीडित अथवा बाधितांना आर्थिक स्वरुपात मदत दिली जाते. आता पावसाळा सुरु झाला आहे. अतिवृष्टीमुळे अनेकवेळा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्याच बरोबर काहीवेळा भूस्खलन, महापूर, चक्रीवादळ या सारख्या घटनांमुळे वित्त वा जीवितहानीच्या घटना घडतात. त्यावेळी राज्य शासनाकडून नुकनास भरपाई देण्यात येते. त्या नुकसान भरपाईचे नेमके दर किती आहेत, ते आपण आज जाणून घेऊयात.
केंद्र सरकारकडून पंधराव्या वित्त आयोगा अंतर्गत राज्य आपत्ती प्रतिसाद निधी(एसडीआरएफ) वितरीत केला जातो. त्यासाठी केंद्र सरकारने काही निकष आणि दर ठरवून दिलेले आहेत. राज्य सरकारकडून या निकषांप्रमाणेच आपत्ती काळात नुकसान भरपाईचे वितरण करण्यात येते. केंद्राने 2022 मध्ये SDRF च्या निकषामध्ये आणि दरामध्ये सुधारणा केली होती. त्यानंतर राज्यशासनाने देखील तो बदल स्वीकारत नव्या नियमांनुसार नुकसान भरपाई देण्याचे निश्चित केले आहे. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकष हे 2025-26 पर्यंत लागू असतील.
किती मिळते नुकसान भरपाई?
चक्रीवादळ, दुष्काळ, भूकंप, आग, पूर, त्सुनामी, गारपीट, भूस्खलन, हिमस्खलन, ढगफुटी, कीटकांचा हल्ला, दंव आणि शीत लहरी अशा प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीमुळे जीवित अथवा वित्तहानी झाल्यास राज्य आपत्ती प्रतिसाद विभागाकडून नुकसान भरपाई दिली जाते. यासाठी झालेल्या नुकसानीचा महसूल विभागाकडून अथवा संबंधित शासकीय यंत्रणेकडून पाहणी करून पंचनामा केला जातो, त्यानंतर नुकसानग्रस्त व्यक्ती, कुटुंबास आर्थिक स्वरुपात मदत दिली जाते. राज्य आपत्ती प्रतिसाद निधीचे दर आणि निकष पुढील प्रमाणे आहेत.
- आपत्तीमध्ये मृत्यू झाल्यास- मृतांच्या कुटुंबियांना 4 लाख रुपयांपर्यंतचा निधी दिला जातो
- 40 ते 60 % अपंगत्व आल्यास 74 हजार रुपये
- 60% अधिक अपंगत्व आल्यास 2.50 लाख रुपये
- जखमींवर रुग्णालयात एक आठवड्यापेक्षा अधिक कालावधीसाठी उपचार 16 हजार रुपये
- एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी उपचार 5400 रुपये
मालमत्तेचे नुकसान झाल्यास -
- दोन दिवसांपेक्षा जास्त कालावधीसाठी घर पाण्यात बुडल्यास/वाहून गेल्यास/ नुकसान झाल्यास प्रति कुटुंब 2500 रुपये
- घरातील साहित्याचे नुकसान झाल्यास प्रति कुटुंब 2500 रुपये
- सखल भागातील घराचे पूर्णत: नुकसान झाल्यास पक्क्या/कच्च्या घरांसाठी 1 लाख 20 हजार रुपये
- दुर्गम भागातील घरांसाठी 1 लाख 30 हजार
- दुर्गम किंवा सखल भागातील घरांची अंशत: पडझड झाल्यास पक्क्या घरांसाठी 6 हजार 500
- अंशत:पडझड झालेल्या कच्च्या घरांसाठी 4 हजार रुपये
- झोपडीसाठी 8 हजार रुपये
जनावरांची जीवितहानी झाल्यास-
- दुध देणाऱ्या जनावरांचा मृत्यू झाल्यास - 37500 रुपये
- शेतीची मेहनतीची कामे करणाऱ्या जनावरासाठी -32000
- वासरू, गाढव, खेचर इत्यादीसाठी - 20000
- शेळी मेंढी डुक्कर इत्यादीसाठी 4000 रुपये
- कुक्कुट पालन- 100 रुपये प्रति कोंबडी (एकूण मदत 10000 रुपयांपर्यंत)
शेती पिकाचे नुकसान झाल्यास-
- जिरायत 8500 रुपये (2 हेक्टरसाठी)
- सिंचनाखालील जमिनीतील पिकांसाठी- 17000 रुपये (प्रति हेक्टर)
- बहुवार्षिक बागायती पिकांसाठी 22500 रुपये (प्रति हेक्टर)
- शेत जमिनीचे नुकसान झाल्यास -18000 रुपये प्रतिहेक्टर
- शेतजमिनीवर दरड कोसळून नुकसान, अथवा माती वाहून गेल्यास - 47000 प्रति हेक्टर
मत्स्य व्यवासायिकांना
- बोट पुर्णत: नष्ट झाल्यास -15000 रुपये
- बोटींच्या अंशत: दुरुस्तीसाठी-6000 रुपये
- पुर्णत:नष्ट जाळ्यांसाठी -4000 रुपये
- जाळ्यांच्या दुरुस्तीसाठी -3000 रुपये