शेतकऱ्यांना शेती व शेतीशी संबंधित कामासाठी आर्थिक मदत करण्याच्या उद्देशाने सरकारने किसान क्रेडिट कार्ड ही योजना आणली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना बी-बियाणे, खतं, कीटकनाशकं आदी शेतीच्या कामांसाठी कर्ज दिले जाते. या योजने अंतर्गत शेतकऱ्याला 3 लाखांपर्यंत कर्ज दिले जाते. तसेच या कर्जावरील व्याजदर खूपच कमी असतो. याचबरोबर काही बॅंका अधिकच्या क्रेडिट लिमिटबरोबरच कर्ज फेडण्याच्या कालवधीतही शेतकऱ्यांना जास्तीची सवलत देतात. अशा कोणत्या बॅंका आहेत. ज्या किसान क्रेडिट कार्ड द्वारे शेतकऱ्यांना अधिकच्या सवलती देतात. ते आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी किसान क्रेडिट कार्ड कसे काढायचे? त्याचे फायदे काय हे समजून घेणार आहोत.
कोणाला मिळू शकते किसान क्रेडिट कार्ड
- अर्जदाराची स्वतःच्या मालकीची शेतजमीन हवी.
- शेतकऱ्याचे वय 18 ते 75 वर्ष या दरम्यान असावे.
- ज्या बँकेत किसान क्रेडिट कार्डसाठी अर्ज केला आहे. त्या बँकेच्या नजीकच्या परिसरात अर्जदाराचे राहण्याचे ठिकाण असावे.
- मत्स्यपालन करणाऱ्यांकडे मत्स्यपालनाशी संबंधित घटकांची तलाव, बोट इत्यादी निगडित वस्तुंची मालकी असणे गरजेचे आहे.
- मासेमारी व्यवसायिकांकडे स्वतःच्या मालकीची बोट, समुद्रात मासेमारी करण्याचा परवाना आदी गोष्टींची गरज आहे.
- पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांकडे स्वतःच्या मालकीच्या शेळ्या, मेंढ्या व इतर संबंधित गोष्टींची मालकी असावी.
किसान क्रेडिट कार्डचे फायदे
- शेतकऱ्याला या योजने अंतर्गत 3 लाख रूपयांचे कर्ज दिले जाते. त्यातील 1.6 लाखांपर्यंतचे कर्ज विनातारण मिळते. त्यापेक्षा अधिक कर्ज घेतल्यास काहीतरी तारण (गहाण) ठेवावे लागते.
- किसान क्रेडिट कार्डमधून पैसे एटीएममधून काढू शकतो किंवा डायरेक्ट पेमेंटदेखील करु शकतो.
- कार्डचा वापर करून शेतीशी निगडित वस्तुंच्या खरेदीवर सूट मिळू शकते.
- क्रेडिट कार्डद्वारे वापरलेल्या रकमेची परतफेड सोयीनुसार 3 ते 5 वर्षांत करू शकता.
- क्रेडिट कार्डधारकाला विम्याचे संरक्षण मिळते. काही कारणास्तव कार्डधारकाला अपंगत्व आल्यास किंवा मृत्यू झाल्यास कार्डधारकाच्या कुटुंबाला 50 हजार रुपयांपर्यंतची मदत मिळते. तसेच इतर धोक्यांसाठी 25 हजार रूपयांचं विमा संरक्षण मिळते.
- किसान क्रेडिट कार्डचा वापर शेतीच्या कामा व्यतिरिक्त वैयक्तिक आर्थिक अडचणीतही वापरू शकतो.
टॉप किसान क्रेडिट कार्ड बॅंक | ||
क्रेडिट कार्ड बॅंक | क्रेडिट लिमिट | कमाल कालावधी |
अक्सिस किसान क्रेडिट कार्ड | 2.50 लाख | रोख रकमेसाठी 1 वर्ष आणि टर्म लोनसाठी 7 वर्षे |
बॅंक ऑफ इंडिया क्रेडिट कार्ड | शेतकऱ्याच्या अपेक्षित उत्पन्नापैकी 25 टक्केपर्यंत | लागू नाही |
एसबीआय किसान क्रेडिट कार्ड | पिक पद्धतीवर | 5 वर्षे |
एचडीएफसी किसान क्रेडिट कार्ड | 3 लाखापर्यंत | 5 वर्षे |
स्त्रोत: www.bankbazaar.com |
किसान क्रेडिट कार्डसाठी असा अर्ज करा
भारतातील अधिकाधिक शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डचा लाभ घेता यावा यासाठी सरकारने पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या सगळ्या लाभार्थ्यांचा या योजनेत समावेश करण्याची मोहीम हाती घेतली.
पीएम-किसान योजनेच्या वेबसाईटवर किसान क्रेडिट कार्डसाठीचा अर्ज उपलब्ध करून देण्यात आला दिला. अर्जासाठी यावर क्लिक करा. हा अर्ज कसा भरायचा ते आपण पाहुया. हा फॉर्म A ते H असा 8 भागांमध्ये विभागला आहे. A भागातील माहिती बॅंकेचे अधिकारी भरतील. B भागात तुम्हाला कार्ड नवीन आहे की, जुन्या कार्डची मर्यादा वाढवायची आहे का? किंवा बंद पडलेलं कार्ड पुन्हा सुरू करायचे आहे का? त्याची माहिती द्या.
C भागात तुमची स्वत:ची आणि बॅंक खात्याची माहिती द्यायची आहे. तसेच तुम्हाला पंतप्रधान सुरक्षा बिमी योजना आणि पंतप्रधना जीवन ज्योती बिमा योजने अंतर्गत विमा घ्यायचा असेल तर YES या पर्यायावर टीकमार्क करा. पण यासाठी दरवर्षी तुम्हाला 342 रूपयांचा हप्ता भरावा लागेल आणि त्या बदल्यात तुम्हाला 2 लाख रूपयांचे विमा संरक्षण मिळेल.
पुढील D भागात जर तुम्ही कर्ज घेतलेले असेल तर त्याची सर्व माहिती द्यायची आहे. त्यानंतर E भागात शेतजमिनीबद्दलची माहिती द्यायची आहे. जसे की, तुमच्याकडे किती जमीन आहे. त्यातील खरीप आणि रब्बी किती? कोणती पिके घेता इत्यादी.
F भागात मत्स्यपालन आणि पशुपालन करणाऱ्या शेतकऱ्यांनी माहिती भरायची आहे. त्यात दूध देणाऱ्या प्राण्यांची संख्या, प्राण्यांचे प्रकार, डुकर तसेच कोंबड्या किती इत्यादी. मत्सपालन कुठे करता समुद्रात की मत्स्यपालनाद्वारे याची माहिती द्यायची आहे.
त्यानंतर डिक्लेरेशनद्वारे भरलेल्या माहितीची सत्यता करण्यासाठी सही करून अर्जासोबत सातबारा उतारा, 8-अ, बॅंकेतून कर्ज घेतले असेल तर त्याचे स्टेटमेंट, आधार कार्ड, पॅन कार्ड आणि 3 पासपोर्ट साईज फोटो इत्यादी कागदपत्रे बॅंकेकडे जमा करायची आहेत.