Real Estate: बॅंक लिलाव प्रक्रियेतून कमी किमतीत घर किंवा एखादी प्रॉपर्टी विकत घेणे ही एक चांगली संधी असू शकते. पण अशा पद्धतीने प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टींची कटाक्षाने माहिती घेतली पाहिजे. कारण लिलाव प्रक्रियेत प्रॉपर्टी खरेदी करताना, प्रॉपर्टीची प्रत्यक्ष पाहणी, त्याची मालकी, मूळ कागदपत्रे, थकित रक्कम याची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा लिलाव प्रक्रियेतून खरेदी केलेल्या प्रॉपर्टीचा त्रासच अधिक होऊ शकतो. त्यामुळे लिलाव प्रक्रियेतून घर किंवा प्रॉपर्टी खरेदी करताना कोणत्या गोष्टींची माहिती असायला हवी. हे आपण पाहणार आहोत.
Table of contents [Show]
प्रॉपर्टीचा लिलाव करणाऱ्या बॅंका शोधा
ज्या बॅंका प्रॉपर्टींचा लिलाव करतात, अशा बॅंकांची माहिती काढा. यामध्ये प्रामुख्याने भारतातील महत्त्वाच्या बॅंका प्रॉपर्टीचा लिलाव करतात. यामध्ये स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बॅंक, कॅनरा बॅंक यांचा समावेश असतो.
बॅंकांच्या वेबसाईट पाहा
बॅंकेच्या लिलाव प्रक्रियेतून प्रॉपर्टी घेण्याचा तुमचा निर्णय पक्का झाला असेल आणि कोणत्या बॅंकांना प्राधान्य द्यायचे ठरल्यावर त्या बॅंकांच्या वेबसाईट वरचेवर पाहत राहा. कारण सर्व बॅंका लिलाव प्रक्रियेची माहिती वेबसाईटवर प्रसिद्ध करत असतात. काही बॅंकांनी तर यासाठी वेगळा विभागदेखील तयार केला आहे.
ऑनलाईन लिलाव करणाऱ्या वेबसाईटना भेट द्या
मार्केटमध्ये ऑनलाईन लिलाव प्रक्रिया पार पाडणाऱ्या अनेक वेबसाईट्स आहेत. जसे की, BankAuctions.in, eAuctionsIndia.com इत्यादी. ज्या भारतात बॅंकेद्वारे होणाऱ्या प्रॉपर्टी लिलावाची माहिती देत असतात. या अशा वेबसाईट्स सर्व बॅंकांकडून माहिती गोळा करून त्या ठिकाण, किंमत, तारीख अशा पद्धतीने एकत्रित करून आपल्या साईटवर प्रसिद्ध करत असतात.
नियमित वर्तमानपत्रे चाळा
बॅंका प्रॉपर्टीची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी महत्त्वाच्या न्यूजपेपर्समध्ये त्याची जाहिरात देतात. काही प्रमाणात याची माहिती वर्तमानपत्रातून प्रसिद्ध करणे बॅंकांना बंधनकारक असते.
बॅंकेशी संपर्क साधा
तुम्हाला बॅंकेच्या वेबसाईटवरून किंवा इतर माध्यमातून बॅंकेद्वारे होणाऱ्या प्रॉपर्टीच्या लिलाव प्रक्रियेची माहिती मिळत नसेल तर थेट बॅंकेशी संपर्क साधा. बॅंकेत जाऊन तुम्ही याविषयी विचारणा करू शकता. तिथून लिलाव प्रक्रियेची नेमकी माहिती मिळण्यास मदत होऊ शकेल.
अशाप्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून तुम्हाला बॅंकेद्वारे होणारी प्रॉपर्टी लिलाव प्रक्रियेबद्दल माहिती मिळू शकते. तसेच बॅंकेद्वारे होणाऱ्या लिलाव प्रक्रियेतून कमी किमतीत चांगली प्रॉपर्टी मिळू शकते. पण त्याचबरोबर अशी खरेदी प्रॉपर्टी खरेदी करताना काही गोष्टींची खातरजमा करून घेणे गरजेचे आहे. लिलाव प्रक्रियेतून घर विकत घेताना खालील गोष्टी नक्की चेक करा.
घराची कागदपत्रे आणि मालकी
लिलाव प्रक्रियेतून घर खरेदी करताना प्रॉपर्टीची कागदपत्रे आणि मालकी हक्क कोणाचे आहेत, हे सर्वप्रथम पाहावे. कारण जी प्रॉपर्टी तुम्ही विकत घेणार आहात. त्याची कागदपत्रे पूर्ण आहेत का? ती कोणत्याही चुकीच्या प्रकरणात अडकलेली किंवा डिस्प्युट असलेली प्रॉपर्टी नाही ना याची खात्री करून घेणे गरजेचे आहे.
प्रॉपर्टीची प्रत्यक्ष पाहणी
तुम्ही जी प्रॉपर्टी खरेदी करण्याची तयारी दाखवली आहे. त्या प्रॉपर्टीची प्रत्यक्ष पाहणी करणे गरजेचे आहे. ती प्रॉपर्टी चांगल्या कंडिशनमध्ये आहे का? त्याची खूप डागडुजी करावी लागेल का? त्यासाठी किती खर्च येऊ शकतो. याचा अंदाज घेण्यासाठी आणि एकूणच कोणतीही प्रॉपर्टी किंवा घर खरेदी करताना ती पाहणे गरजेचे आहे.
दायित्वे आणि थकबाकी
कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करताना त्या प्रॉपर्टीवर कोणतीही दायित्वे किंवा थकबाकी नाही ना याची खातरजमा करणे आवश्यक आहे. काही घरांचे वर्षानुवर्षे प्रॉपर्टी टॅक्स भरला जात नाही. तसेच विजेचे बिल भरलेले नसते काहीं जणांनी बॅंकांचे हफ्ते चुकवलेले असतात. या थकबाकींचा भार प्रॉपर्टी खरेदी करताना येऊ नये, यासाठी याची माहिती घेणे गरजेचे आहे.
बॅंकांद्वारे होत असलेली लिलाव प्रक्रिया कशी केली जाणार आहे. त्याचे नियम काय आहेत. त्यासाठी बॅंकेने काही मार्गदर्शक अटी घातलेल्या आहेत का? बिडिंग प्रोसेस कशी असेल. याची माहिती तुम्हाला अगोदरच असेल तर प्रत्यक्ष लिलाव प्रक्रियेच्यावेळी तुम्ही तयार असाल. त्याचबरोबर लिलाव प्रक्रियेत फायनान्सिंगची प्रक्रिया कशी असणार आहे. हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. त्या आधारे तुम्हाला बॅंकेकडून प्री-अॅप्रूव्हल लोनची प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी लागेल किंवा इतर पर्याय पाहावे लागतील.