रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आज 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वीच शेअर बाजारात सकारात्मक परिणाम दिसून आला. आज सकाळच्या सत्रात जिओ फायनान्शिअलचा शेअर 4% ने वधारला आहे. आजच्या सभेत रिलायन्सचे अध्यक्ष मुकेश अंबानी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या विस्ताराबाबत मोठ्या घोषणा करण्याची शक्यता आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर 21 ऑगस्ट 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध झाला होता. त्यानंतर सलग चार सत्रात त्यामध्ये घसरण झाली होती. जिओ फायनान्शिअलचा शेअरमध्ये लिस्टींगनंतर सातत्याने घसरण होत असल्याने गुंतवणूकदारांमध्ये निराशाजनक वातावरण निर्माण झाले होते.
लिस्टींगनंतर चार सत्रात जिओ फायनान्शिअलच्या शेअरची घसरण झाली. यात गुंतवणूकदारांचे किमान 25000 कोटींचे नुकसान झाले होते. मात्र आज रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सभेपूर्वी जिओ फायनान्शिअलच्या शेअरने निराशा झटकली.
सकाळच्या सत्रात जिओ फायनान्शिअलचा शेअर 4.47% तेजीसह 221.75 रुपयांवर पोहोचला. आजच्या दिवसभरातील हा उच्चांकी स्तर होता. दुपारी 12 वाजता जिओ फायनान्शिअलचा शेअर 217.75 रुपयांवर ट्रेड करत आहे. या शेअरमध्ये आज 9188350 इतका व्हॉल्यूम आहे.
रिलायन्सच्या सभेत होणार मोठ्या घोषणा
आज सोमवारी 28 ऑगस्ट 2023 रोजी दुपारी 2 वाजता होणार आहे. आजच्या सभेत रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी कोणत्या घोषणा करणार याकडे गुंतवणूकदारांनाचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत अंबानी यांच्याकडून न्यू एनर्जी, जिओ 5G सेवेबाबत महत्वाच्या घोषणा केल्या जातील. त्याचबरोबर जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या व्यावसायिक विस्ताराचा आराखडा अंबानी यांच्याकडून सादर केला जाण्याची शक्यता आहे.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)