रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेल्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर्सचे (JFSL) रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर होल्डर्सला वाटप करण्यात आले आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस प्राप्त करण्यासाठी 20 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली होती. त्यानुसार पात्र गुंतवणूकदारांच्या डिमॅट खात्यात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे शेअर ॲलॉट करण्यात आल्याचे कंपनीने म्हटले आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची अजूनही शेअर मार्केटमध्ये लिस्टिंग झालेली नाही. त्यामुळे या शेअर्स मध्ये गुंतवणूकदारांना ट्रेड करता येणार नाही. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांच्याकडून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या लिस्टिंगबाबत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस या शेअरचा कंपनी निफ्टी 50, बीएसई सेन्सेक्स आणि इतर निर्देशांकावर समावेश करण्यात आला आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअर ची किंमत प्रती समभाग 261.85 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ब्रोकर्स आणि शेअर बाजार विश्लेषक यांनी
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा दर 190 रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजसाठी मात्र जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या प्रत्येक शेअर्सची किंमत 133 रुपये इतकी होती.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार भांडवल जवळपास 1.66 लाख कोटी इतके असण्याची शक्यता आहे. बिगर बँकिंग वित्त संस्थांमधील जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही भारतातील सर्वाधिक बाजार भांडवल असणारी कंपनी ठरणार आहे.
वित्त सेवा क्षेत्रात प्रचंड संधी आहेत. या संधी डिजिटल फायनान्स च्या माध्यमातून पूर्ण करण्याची क्षमता जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस मध्ये आहे असा विश्वास मुकेश अंबानी यांनी व्यक्त केला. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक अहवालात अंबानी यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसबद्दल आपली मते मांडली आहेत. भारतीयांना आर्थिक सेवा तंत्रज्ञानाच्या साहाय्याने देण्यास जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सज्ज असल्याचे अंबानी यांनी म्हटले आहे.
रिलायन्स AGM मध्ये होणार मोठी घोषणा
येत्या 28 ऑगस्ट 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजची वार्षिक सर्वसाधारण सभा होणार आहे. या सभेला रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी संबोधित करतील. यावेळी अंबानी यांच्याकडून
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस कधी सूचीबद्ध होणार याविषयी घोषणा केली जाण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली आहे. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे कामाचे स्वरूप आणि देशभर विस्तार, कंपनीच्या सेवा आणि आर्थिक उद्दिष्ट्ये याबाबत अंबानी भाष्य करण्याची दाट शक्यता आहे.
कसा असेल जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा बिझनेस
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही इन्शुरन्स, कर्ज वितरण, डिजिटल ब्रोकिंग, डिजिटल पेमेंट, मालमत्ता व्यवस्थापन आणि म्युच्युअल फंड वितरण यासारख्या वित्तीय सेवा क्षेत्रात काम करेल. जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने नुकताच ब्लॅकरॉक या कंपनीशी संयुक्त उद्यम जाहीर केला होता. या नव्या कंपनीच्या माध्यमातून म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये उतरण्याचा जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा मार्ग मोकळा झाला आहे.