Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Jio Financial Services Share Fall: 'जिओ फायनान्शिअल'ला खरेदीदारच नाही! गुंतवणूकदारांचे 23 हजार कोटी बुडाले

Jio Financial Services

Image Source : www.twitter.com

Jio Financial Services Share Fall: रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त होऊन स्वतंत्रपणे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमागील शुल्ककाष्ठ संपलेला नाही. जिओ फायनान्शिअलचा शेअर 5% घसरणीसह 227.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. तीन सत्रात गुंतवणूकदारांचे 23000 कोटी बुडाले आहेत.

रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त होऊन स्वतंत्रपणे शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरमागील शुल्ककाष्ठ संपलेला नाही. आज बुधवारी 23 ऑगस्ट 2023 रोजी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसच्या शेअरला लोअर सर्किट लागले. NSE वर आज सकाळी 9.30 वाजता तब्बल 13 कोटी 60 लाख शेअर्ससाठी कोणीच खरेदीदार नसल्याचे दिसून आले आहे. आज जिओ फायनान्शिअलचा शेअर 5% घसरणीसह 227.25 रुपयांवर ट्रेड करत आहे. सलग तीन सत्रात गुंतवणूकदारांचे 23000 कोटी बुडाले आहेत.

जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी बीएसई आणि एनएसईवर सूचिबद्ध झाला होता. बीएसईवर जिओ फायनान्शिअल 265 रुपयांना तर एनएसईवर तो 262 रुपयांना लिस्ट झाला होता. जिओ फायनान्शिअल विभक्त झाल्यानंतर त्याची सरासरी किंमत 261.85 रुपये इतकी ठरवण्यात आली होती.

jio-financial-services-lt.jpg
Source: money.rediff.com

जिओ फायनान्शिअलच्या लिस्टिंगपूर्वी काही शेअर बाजार विश्लेषकांनी हा शेअर 300 रुपयांचा टप्पा ओलांडेल असा अंदाज वर्तवला होता. मात्र प्रत्यक्षात जिओ फायनान्शिअलने गुंतवणूकदारांची सपशेल निराशा केली आहे.

लिस्टींगच्या पहिल्या दिवसापासून जिओ फायनान्शिअलचा शेअर सातत्याने घसरत आहे. सलग तीन सत्रात जिओ फायनान्शिअलचा शेअर 15% हून अधिक कोसळला आहे. याला कारणीभूत संस्थात्मक गुंतवणूकदार आणि पॅसिव्ह म्युच्युअल फंड्स असल्याचे बोलले जाते. या पडझडीने गुंतवणूकदारांचे 23000 कोटींचे नुकसान झाले आहे. कंपनीची मार्केट व्हॅल्यू 7 हजार 496 कोटींनी कमी होऊन ती 1.43 लाख कोटी इतकी झाली.

निफ्टी निर्देशांकात गुंतवणूक करणाऱ्या पॅसिव्ह म्युच्युअल फंडांनी मागील दोन सत्रात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे 90 मिलियन शेअर्स विक्री केले आहेत. सेन्सेक्सवर याच गुंतवणूकदारांनी 55 मिलियन शेअर्सची विक्री केली आहे. ज्याचा फटका जिओ फायनान्शिअल्सच्या शेअरला बसला.

दोन सत्रात लोअर सर्किटमुळे शेअरला फटका

सलग दोन सत्रात लोअर सर्किट लागल्याने आज जिओ फायनान्शिअलचा शेअर निफ्टी आणि सेन्सेक्समधून बाहेर पडावे लागेल. त्यापार्श्वभूमीवर शेअरवर दबाव आहे. एसअ‍ॅंडपी बीएसईच्या सर्वच निर्देशांकातून जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस 29 ऑगस्ट 2023 पूर्वी बाहेर पडेल. आता आणखी सलग दोन सत्रात शेअरला लोअर सर्किट लागले तर सर्वच निर्देशांकातून बाहेर पडण्याची प्रक्रिया तीन दिवसांनी पुढे जाईल. 

LIC ने जिओ फायनान्शिअलमध्ये केली मोठी गुंतवणूक

भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसीने जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसमध्ये 6.66% हिस्सा खरेदी केला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजमधून जिओ फायनान्शिअल विभक्त झाल्यानंतर एलआयसीने जिओ फायनान्शिअलमध्ये 6.66% हिस्सा खरेदी केला आहे. याबाबत एलआयसीकडून शेअर बाजाराला माहिती देण्यात आली. त्याचबरोबर आणखी 4.68% हिस्सा खरेदी करण्यात येणार असल्याचे एलआयसीने म्हटले आहे. 

(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)