रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त झालेली जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस या कंपनीने आज शेअर मार्केटमध्ये प्रवेश केला. आज सोमवारी 21 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 10 वाजता मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसची दमदार लिस्टींग झाली. जिओ फायनान्सचा शेअर BSE वर 265 रुपयांना तर NSE वर 263 रुपयांना सूचिबद्ध झाला.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे 20 जुलै 2023 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभाजन झाले होते. या व्यवहारासाठी 20 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली होती. ज्या गुंतवणूकदारांकडे रिलायन्स इंडस्ट्रीजचे शेअर होते त्यांना 1:1 या प्रमाणानुसार रिलायन्स जिओ फायनान्शिअलचे शेअर वाटप करण्यात आले होते.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा सिम्बॉल JIOFIN असून हा शेअर सुरुवातीचे 10 दिवस T श्रेणीत असेल. सुरुवातीचे काही दिवस यात मोठी उलाढाल रोखण्यासाठी 5% अप्पर आणि लोअर सर्किट लावले जाणार आहे. आज लिस्टींग झाल्यावर ब्लॉक डिल्समुळे जिओ फायनान्शिअलचा शेअर 5% घसरला. तो 249 रुपयांवर ट्रेड करत आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार मूल्य जवळपास 20 बिलियन डॉलर्स इतके आहे. भारतीय चलनात जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचे बाजार मूल्य 1.66 लाख कोटी इतके आहे. आज ही कंपनी मुकेश अंबानी सामान्य गुंतवणूकदारांसाठी गुंतवणुकीसाठी खुली करतील. जवळपास 20 वर्षांनंतर रिलायन्स समूहातून एखादी कंपनी शेअर मार्केटमध्ये प्रवेश करणार असल्याने जगभरातील गुंतवणूकदारांचे लक्ष जिओ फायनान्शिअलच्या लिस्टिंगकडे लागले आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचेचे प्रति शेअर मूल्य 261.85 रुपये निश्चित करण्यात आले आहे. मात्र गुंतवणूकदारांची उत्सुकता आणि मुख्य कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजचा शेअर मार्केटमधील दबदबा पाहता जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा शेअर 300 रुपयांवर लिस्ट होण्याची शक्यता जाणकारांनी व्यक्त केली होती.
रिलायन्सचा प्रत्येकी एक शेअर बाळगणाऱ्या गुंतवणूकदाराला जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा एक शेअर 10 ऑगस्ट 2023 रोजी डिमॅट खात्यात प्राप्त झाला होता. या विभाजनासाठी 1:1 असे प्रमाण निश्चित करण्यात आले आहे.
अंबानीकडून घोषणेची पूर्तता! लिस्टिंगला उपस्थितीत राहणार?
वर्ष 2022 मध्ये झालेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही कंपनी रिलायन्स इंडस्ट्रीजमधून विभक्त होईल, अशी घोषणा केली होती. शेअर बाजारात स्वतंत्रपणे जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस सूचीबद्ध करण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार यंदाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपूर्वी अंबानी यांनी घोषणेची पूर्तता केली. मात्र आजच्या लिस्टिंग सोहळ्याला मुकेश अंबानी उपस्थित राहून घंटानाद करणार का? याबाबत अद्याप गोपनीयता ठेवण्यात आलेली आहे.
जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसचा असाही रेकॉर्ड
- जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेसने शेअर मार्केटमध्ये सूचिबद्ध होण्यापूर्वी अनेक रेकॉर्ड केले आहेत.
- जिओ फायनान्शिअल सर्व्हिसेस ही भांडवलाच्या दृष्टीने भारतातील तिसरी मोठी एनबीएफसी ठरली आहे.
- जिओ फायनान्शिअल भारतातील 33 वी मोठी कंपनी ठरणार.
- जिओ फायनान्शिअलचे नेतृत्व मुकेश अंबानी करत असून त्यांच्यासोबत इशा अंबानी या कंपनीच्या संचालक आहेत.