Everything About OTP: या डिजिटल युगात OTP टाकल्याशिवाय कोणताच व्यवहार होत नाही. तुम्हाला एटीएमवरून पैसे काढायचे असल्यास, काही एटीएमवर OTP टाकणे बंधनकारक असते. तेव्हाच तुम्हाला व्यवहार करता येतो. तसेच, प्रत्येक डिजिटल व्यवहारासाठी OTP द्यावाच लागतो. मात्र, यासाठी सुरक्षा देखील बाळगणे गरजेचे असते. बँक सुद्धा तुम्हाला OTP शेअर करू नका असा मेसेज पाठवतच असते. कारण, शेअर केल्यास फसवणूक होण्याची शक्यता असते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक फटका बसतो. त्याच पार्श्वभूमीवर आज आपण ओटीपीचे फायदे-तोटे जाणून घेणे महत्वाचे आहे.
OTP काय आहे?
OTP म्हणजेच One Time Password हे त्याचे पूर्ण स्वरुप आहे. याचा वापर अल्पकालावधीसाठी होतो. म्हणजेच 2 मिनिटांपर्यंतच तो वैध राहतो. त्यानंतर त्याची मुदत संपून जाते. काही ठिकाणी त्याची मुदत कमी जास्त असू शकते. तुम्ही परत तो वापरायचा प्रयत्न केल्यास, तुम्हाला पोर्टलवर चुकीचा ओटीपी असल्याचा पाॅप-अप येईल. कारण, ओटीपी व्हेरिफिकेशन कोडचे काम करतो.
याद्वारे व्यवहार करणारी व्यक्ती कार्ड किंवा खात्याचा मालक असल्याचे सिद्ध होते. त्यामुळेच व्यवहारासाठी ओटीपी खूप महत्वाचा मानला जातो. हेच सोशल मीडिया, पोर्टल आणि अॅपसाठीही लागू आहे. त्यामुळे तुमचा पैसा तर सुरक्षित राहतो. त्याचबरोबर तुमचा डेटा आणि ओळखही शाबूत राहते. याचसाठी आज सर्वच स्तरावर ओटीपीचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे.
OTP चे फायदे काय?
ओटीपीमुळे पासवर्ड लक्षात ठेवायचे टेन्शन राहिले नाही. तुम्ही पासवर्ड विसरला तरी पुन्हा जनरेट करू शकता. कारण, त्यासाठी देखील ओटीपीचाच वापर होतो. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या बँक खात्याला सुरक्षित करु शकता. त्यामुळे बँकेचा पासवर्ड आणि युजरनेम चोरी झाले तरी तुमचे पैसे बँकेतून कोणीच काढू शकत नाही. कारण, त्यासाठी तुमचा मोबाईल गरजेचा असणार आहे.
त्यावरच तुमचा OTP येईल आणि तो टाकल्याशिवाय व्यवहार करता येणार नाही. त्याचबरोबर सोशल मीडिया खाते बनवण्यासाठी तुम्हाला OTP आवश्यक असणार आहे. त्यामुळे तुमचे खाते सुरक्षित राहायला मदत होते. ओटीपीचा वापर करण्यासाठी तुम्हाला पैसे देण्याची गरज पडत नाही. तसेच याची प्रक्रिया खूप जलद होते. त्यामुळे ग्राहकाचे कोणतेच काम अडकून राहत नाही.
OTP चे तोटे काय?
तुमच्या आयुष्याची पूर्ण जमापूंजी मोबाईलवरच आहे. त्यामुळे मोबाईल म्हणजे तुमचा जीवच आहे. कारण, तो जर चोरी गेला तर तुमचे खाते खाली व्हायला वेळ लागत नाही. त्यामुळे तुम्हाला मोबईल सांभाळून ठेवणे आवश्यक आहे. तसेच काही वेळा तांत्रिक अडचणींमुळे ओटीपीला उशीर लागतो. त्यामुळे पेमेंट संबंधित गोष्टीसाठी वेळ लागू शकतो. त्याचबरोबर एखाद्यावेळी मोबाईल डिस्चार्ज झाला आणि तुम्हाला OTP ची आवश्यकता असल्यास, तो मिळणार नाही. त्यामुळे तुमची फजिती होऊ शकते.