चांद्रयान 3 च्या यशानंतर भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्त्रोकडून आज सूर्याच्या दिशेने आदित्य L1 या यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. आज 2 सप्टेंबर 2023 रोजी सकाळी 11.50 वाजता श्रीहरीकोटा येथील सतीश धवन स्पेस सेंटरवरुन आदित्य L1चे यशस्वी प्रक्षेपण झाले. रॉकेटने प्रक्षेपणातील दोन मुख्य टप्पे पार केले आहेत.
आदित्य L1 मिशनमध्ये आज यानाचे यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले. यानंतर इस्त्रोच्या वैज्ञानिकांनी एकमेकांचे अभिनंदन केले. सूर्य आणि सूर्याभोवती असलेल्या आवरणाचा अभ्यास करण्यासाठी इस्त्रोने आदित्य L1 मोहीम तयार केली आहे.
या मोहीमेत सूर्य आणि सूर्याभोवती असलेल्या आवरण, वातावरणातील बदल यांचा अभ्यास करण्यात येणार आहे. यासाठी पृथ्वी आणि सूर्य यामधील L1 या एका पॉइंटची निवड करण्यात आली आहे. या पॉइंटवर आदित्य यान पोहोचल्यावर सूर्याचा अभ्यास सुरु होणार आहे.
सूर्याचा पृथ्वीवरील प्रत्येक घटकावर होणाऱ्या परिणांचा अभ्यास आदित्य L1 मिशनमधून करता येणार आहे. यामुळे सूर्यावर अभ्यास करण्याची संधी जगातील वैज्ञानिक आणि खगोल शास्त्रज्ञांना उपलब्ध होणार आहे.
टाईम्स ऑफ इंडिया या वृत्तसंस्थेनुसार केंद्र सरकारने आदित्य L1 मिशनसाठी 400 कोटी खर्च केले आहेत. आदित्य L1 मिशनसाठी तयार करण्यात आलेले PSLV, मिशन डिझाईन, नव तंत्रज्ञान यासाठी हा निधी खर्च करण्यात आला आहे.
किती दिवसांत पोहोचणार
आदित्य L1 यानाने प्रक्षेपणानंतर दोन्ही टप्पे यशस्वीपणे पूर्ण केल्याची घोषणा इस्त्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी जाहीर केले. हे यान 125 दिवसांचा अविरत प्रवास करुन L1 पॉइंटपर्यंत पोहोचणार आहे. पृथ्वीपासून हे अंतर जवळपास 15 लाख किलोमीटर इतके आहे. L1 पॉइंटवर पोहोचल्यानंतर आदित्य L1 तिथे पुढील पाच वर्ष थांबणार आहे. तिथून सूर्याच्या भोवतालचे वातावरणीय बदलांचे निरिक्षण आणि माहिती संकलित केली जाणार आहे.