जागतिक स्तरावरील बातम्या ऐकताना विशेषत: आयटी सेक्टरशी संबंधित सिलिकॉन व्हॅली (Silicon Valley) हा शब्द नेहमीच ऐकू येतो. शेअर मार्केट असो किंवा राजकारण सिलिकॉन व्हॅलीचा कुठे ना कुठेतरी संबंध येतोच, पण का? नक्की आहे काय हे सिलिकॉन व्हॅली आणि त्याचे एवढे महत्त्व काय आहे? चला तर मग जाणून घेऊयात सिलिकॉन व्हॅली नक्की काय आहे?
सिलिकॉन व्हॅली हे दक्षिण सॅन फ्रॅन्सिस्को बे एरियामधील भागाचे नाव आहे. सर्व अत्याधुनिक मायक्रोप्रोसेसरमध्ये वापरल्या जाणार्या सिलिकॉन ट्रान्झिस्टरचा थेट संबंध या प्रदेशाशी असल्यामुळे 1970 च्या दशकाच्या सुरुवातीला या जागेचे नाव सिलिकॉन व्हॅली असे पडले. सिलिकॉन व्हॅली हे तांत्रिक नवकल्पनांचे जागतिक केंद्र मानले जाते. जे शेकडो कंपन्यांचे घर देखील आहे. तसेच ते नाविन्यपूर्ण, उद्योजकतेचे केंद्र आणि तंत्रज्ञानावर आधारित जगणारा प्रदेश म्हणूनही ओळखला जातो.
सिलिकॉन व्हॅलीचे जागतिक महत्त्व काय?
सिलिकॉन व्हॅली हा शब्द सर्वप्रथम इलेक्ट्रॉनिक न्यूजने 10 जानेवारी 1971 रोजी वापरला होता. सेमीकंडक्टरचा इतिहास कव्हर करणार्या पत्रकार डॉन होफ्लरने लिहिलेल्या तीन भागांच्या मालिकांचा हा भाग होता. तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापराबरोबरच हळुहळू सिलिकॉन व्हॅली हा शब्द सातत्याने वापरला जाऊ लागला.
सिलिकॉन व्हॅलीचा परिसर हा 1,854 चौरस मीटर क्षेत्रात व्यापलेला आहे. तसेच इथे 3 दशलक्षांहून अधिक लोकांची घरे आहेत. सिलिकॉन व्हॅली हा परिसर कॅलिफोर्नियाला लागून असलेला खाडी प्रदेश आहे. इथले सर्वात मोठे शहर सॅन जोस (San jose) आहे. सॅन जोस हे स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि अनेक विद्यापीठांचे घर आहे. या एज्युकेशनल कॅम्पसमुळे व्हॅली परिसरात संशोधन आणि विकासाला (Research & Development) चालना मिळाली.
सिलिकॉन व्हॅलीमध्ये सुरू झालेल्या हाय प्रोफाईल कंपन्यांमुळे हा प्रदेश गुंतवणूकदारांसाठी एक आकर्षण बनले आहे. डिसेंबर 2020 च्या सुरुवातीपर्यंत जवळपास 117 व्हेंचर कॅपिटॅलिस्टचा पाठिंबा असणाऱ्या पब्लिक कंपन्या या प्रदेशात होत्या. ज्यांचे एकूण मूल्य सुमारे 253 बिलियन डॉलर्स इतके होते.
2020 पर्यंत सिलिकॉन व्हॅलीमध्ये 500हून अधिक फॉर्च्यून कंपन्या होत्या. ज्यात Apple, गुगलची कंपनी Alphabet, Meta (पूर्वीचे Facebook) आणि Netflix या जगप्रसिद्ध कंपन्यांसोबत काही प्रमुख टेक कंपन्या, Cisco Systems, Intel, Oracle आणि Nvidia सारख्या हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर कंपन्या तसेच व्हिसा, शेवरॉन या कंपन्यांची ऑफिसेस सुद्धा सिलिकॉन व्हॅलीमध्ये आहेत.
सिलिकॉन व्हॉलीचे भविष्य काय?
मॅन्युफॅक्चरिंगमध्ये होत असलेल्या सर्वात महत्त्वाच्या संक्रमणापैकी एक म्हणजे रोबोटद्वारे काम करून घेण्याचा येऊ लागलेला ट्रेण्ड. गेल्या 20 वर्षांत चीनने या क्षेत्रात कमीतकमी किमतीत उत्पादन देण्याच्या शर्यतीमध्ये चांगलेच वर्चस्व मिळवले आहे. रोबोटिक्स, 3D प्रिंटिंग तंत्रज्ञानामुळे अत्याधुनिक उत्पादनांचा चेहरामोहरा बदलत आहे. रोबोटच्या कामामध्ये इतके परफेक्शन येते की, त्याची तुलना मानवाच्या कामाशी करता येत नाही. त्यामुळे सध्या सिलिकॉन व्हॅलीसह संपूर्ण जगात रोबोटीक्सची मागणी वाढत आहे. सध्या रोबोटीक्स तंत्रज्ञान मुख्यतः जपान आणि जर्मनीमधून येत आहे. त्यामुळे सिलिकॉन व्हॅलीचे भविष्य हे रोबोटीक्स आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान हेच मानले जाते.
नेटवर्क इफेक्ट हा आणखी एक नवीन ट्रेण्ड वाढू लागला आहे. अशाप्रकारे सिलिकॉन व्हॅली हे आता वैविध्यपूर्ण, तसेच पूर्णपणे तंत्रज्ञान व्यवसायांचे आणि अनेक नवीन व्यवसायांचे केंद्र बनू लागले आहे.