ओदिशामधील बालासोरमध्ये शुक्रवारी 2 जून 2023 रोजी रेल्वे अपघात झाला. यात जवळपास 280 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या अपघातात जवळपास 900 प्रवासी जखमी झाले आहेत. भारतातील मोठ्या रेल्वे अपघातांपैकी हा एक असल्याचे बोलले जाते. रेल्वे अपघातील मृतांना सरकारकडून तातडीची मदत जाहीर करण्यात आली आहे. मात्र रेल्वे तिकिटाबरोबर प्रवाशांना अगदी 35 पैशांमध्ये 10 लाख रुपयांचा विमा सुरक्षेचा पर्याय दिला जातो. या विमा पॉलिसीमधून कोणत्या गोष्टीला नुकसान भरपाई दिली जाते, ते जाणून घेऊया.
ओदिशातील रेल्वे अपघातामुळे प्रवासी विम्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित केली आहे. ओदिशातील बालासोर येथे कोरोमंडल एक्सप्रेसला झालेल्या अपघात मृतांना 12 लाख रुपयांच्या मदतीची घोषणा करण्यात आली आहे. यात रेल्वे मंत्रालयांकडून मृतांच्या वारसांना 10 लाख रुपये आणि प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंडातून 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. या अपघातात गंभीर स्वरुपात जखमी झालेल्यांना रेल्वेकडून 2 लाख रुपयांची मदत दिली जाणार आहे. किरकोळ जखमींना 50000 रुपये आणि प्रधानमंत्री नॅशनल रिलीफ फंडातून जखमींना प्रत्येकी 50000 रुपयांची मदत दिली जाणार आहे.
दरम्यान रेल्वेचे तिकिट बुक करताना प्रवाशांना विमा पॉलिसीचा पर्याय दिला जातो. जो अगदी किरकोळ किंमती उपलब्ध आहे.रेल्वेकडून ऑनलाईन किंवा अॅपवरील तिकिटांवर प्रवासी विम्याचा पर्याय आहे. IRCTC च्या वेबपोर्टलवर तिकिट काढल्यास त्यावर प्रत्येक प्रवाशाला केवळ 35 पैशांमध्ये 10 लाख रुपयांची विमा पॉलिसी प्रवासापुरता दिली जाते. मात्र विमा खरेदीबाबत बहुतांश प्रवाशांमध्ये उदासिनता दिसून येते. विमा प्रिमीयम अगदीच नगण्य असल्याने तो खरेदी करण्याकडे दुर्लक्ष केले जाते.
IRCTC च्या वेबपोर्टलवर लिबर्टी जनरल इन्शुरन्सकडून ऑप्शनल ट्रॅव्हल इन्शुरन्स ही 10 लाखांची विमा पॉलिसी प्रवाशांना दिली जाते.मात्र तिकिट बुक करताना इन्शुरन्स हवा असेल तर तसा पर्याय निवडावा लागतो. बऱ्याचदा प्रवाशांकडून या पर्यायाकडे दुर्लक्ष केले जाते. ज्यामुळे विमा पॉलिसीचे कव्हर मिळत नाही. दुर्देवाने अपघात झाल्यास प्रवाशांच्या वारसांना विमा नसल्याने केवळ सरकारच्या मदतीवर अवलंबून राहावे लागते.
ऑप्शनल ट्रॅव्हल इन्शुरन्स हा एका पीएनआरवर जितके प्रवासी असतील त्यांचा विमा काढता येतो. केवळ एका क्लिकने विमा पॉलिसी इश्यू केली जाते. त्यामुळे ही पद्धत सर्वात सोपी आणि जलद आहे. तिकिट कन्फर्म झाले कि लगेच पॉलिसी डॉक्युमेंट किंवा ई-पॉलिसी प्रवाशाला मेल केली जाते. या विमा पॉलिसीमध्ये प्रवाशाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 10 लाख रुपयांची विमा भरपाई दिली जाते. त्याशिवाय मृत व्यक्तीचे पार्थिव त्याच्या घरी नेण्यासाठी 10000 रुपयांची मदत करण्याची तरतूद या पॉलिसीमध्ये आहे. अपघातात कायमस्वरुपी अपंगत्व आल्यास त्यालाही 10 लाखांची विमा भरपाई दिली जाते.अपघातात अंशिक अपंगत्व आल्यास 7.5 लाख रुपये आणि जखमींना 2 लाखांची मदत केली जाते.