अर्शदीप सिंगने या सामन्यात पंजाबच्या टीमला विजय मिळवून देताना आयपीएलचे मोठे नुकसान झाले आहे. या तुटलेल्या स्टम्पची किंमत थक्क करणारी आहे. काही मीडिया रीपोर्ट्सनुसार एलईडी स्टम्प व बेल्सची किंमत 40 ते 50 हजार डॉलर्स म्हणजेच 32 ते 41 लाख रुपये आहे. तसेच अर्शदीपच्या वेगवान गोलंदाजीमुळे तुटलेल्या एका स्टम्पाची किंमत 8 लाख रुपये इतकी आहे. सर्वप्रथम 2008 साली ऑस्ट्रेलियातील बीबीजी कंपनीने एलईडी स्टम्पची संकल्पना मांडली होती. यानंतर ब्रिटिश कंपनी कॅमने हे हक्क विकत घेऊन स्टम्प निर्मितीला सुरुवात केली.
अर्शदीप शेवटची ओव्हर टाकायला आला तेव्हा मुंबई इंडियन्सला 6 चेंडूत 16 धावांची गरज होती. अर्शदीपने ओव्हरमधील तिसरा चेंडू टाकला. जो सरळ जाऊन मधल्या स्टम्पला लागला आणि स्टम्पचे दोन तुकडे झाले. यावरून चेंडूच्या वेगाचा अंदाज लावता येतो. त्याच्या पुढच्याच चेंडूवर अर्शदीपने नेहल वढेरालाही असेच बाद केले. अशाप्रकारे त्याने सलग दोन चेंडुत दोन खेळाडू बाद केले आणि दोन स्टम्प देखील तोडले. दरम्यान, अर्शदीप सिंगने आयपीएलमध्ये 50 बळी पूर्ण केले. या 24 वर्षीय वेगवान गोलंदाजाने 44 आयपीएल सामन्यांमध्ये 53 विकेट घेतल्या आहेत.
'मॅन ऑफ द मॅच' बक्षीस रकमेहूनही किंमत जास्त
आयपीएल लिलावात काही खेळाडुंना काही लाखांच्या बोलीत समाधान मानावे लागते. कधीतरी अजिंक्य रहाणेसारख्या क्रिकेट दिग्गजांवरही वेळ येते. मात्र आयपीएल सामन्यांमध्ये वापरण्यात येणाऱ्या स्टम्पची किंमत या खेळाडुंच्या पगारापेक्षाही जास्त असते. आयपीएल स्पर्धेत मॅन ऑफ द मॅच खेळाडूला 5 लाख रुपये दिले जातात. त्या तुलनेने या स्टम्पच्या सेटची किंमत 7 ते 8 पट अधिक आहे.
पंचांना अचूक निर्णय घेण्यास मदत
क्रिकेटमध्ये सुरुवातीला लाकडी स्टम्पचा वापर होत असे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे या खेळातील अनेक वस्तुंना देखील उपकरणांचे स्वरूप मिळाले. जसे स्टम्पमध्ये एलईडी मोशन सेन्सरचा वापर सुरू झाला. यामुळे स्टम्पला चेंडू लागल्यास तो एलईडीच्या मदतीने पंचांना निर्णय घेणे सोपे होते. चेंडूचा स्पर्श स्टम्पाला झाल्यास त्यातील एलईडी चमकू लागतात.