अॅपलकडून नुकताच लॉंच करण्यात आलेल्या iPhone 15 या मेड इन इंडिया आयफोनसाठी भारतीय ग्राहकांना मोठी रक्कम मोजावी लागणार आहे. iPhone 15 ची भारतातील किंमत 1 लाख 99 हजार 900 रुपये इतकी आहे. अमेरिका आणि दुबईच्या तुलनेत भारतीय बाजारातील आयफोन 15 ची किंमत जवळपास 51% हून अधिक आहे. या प्रचंड किंमतीमुळे भारतातच उत्पादन घेतल्याने आयफोन वाजवी दरात उपलब्ध होईल, असा दावा फोल ठरला आहे. (iPhone 15 Pro Max Price in India)
आयफोनच्या अद्ययावत मॉडेलची मागील काही महिन्यांपासून अॅपल प्रेमींना प्रतीक्षा लागली होती. अॅपलकडून मंगळवारी 12 सप्टेंबर रोजी आयफोन 15 चे अनावरण करण्यात आले. या नव्या आयफोनची आगाऊ बुकिंग 15 सप्टेंबर 2023 रोजी संध्याकाळी 5.30 वाजेपासून सुरु होणार आहे. 22 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 बाजारपेठेत उपलब्ध होणार आहे.
दरम्यान, आयफोन 15 ची किंमत कंपनीकडून जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार भारतात iPhone 15 Pro Max (1 Terabyte) या मॉडेलची किंमत 1,99,900 रुपये इतकी आहे. अमेरिकेत याच फोनची किंमत 1599 डॉलर (भारतीय चलनात 1,32,717 रुपये) इतकी आहे. iPhone 15 Pro Max ची दुबईमधील किंमत ही 3399 दिऱ्हम (भारतीय चलनात 76,817 रुपये) इतकी आहे.
कंपनीच्या माहितीनुसार भारतात iPhone 15 Pro ची किंमत 1,34,900 रुपये इतकी आहे. हाच फोन अमेरिकेत 82,917 रुपयांत उपलब्ध आहे. दुबईत iPhone 15 Pro साठी 92,157 रुपये इतकी किंमत आहे. iPhone 15 Pro Max हे मॉडेल भारतात 1,59,900 रुपयांना आहे. अमेरिकेत या मॉडेलची किंमत 99,517 रुपये आणि दुबईत 1,15,237 रुपये इतकी किंमत आहे.
कोरोनानंतर अॅपलने भारतातील आयफोनचे उत्पादन वाढवले आहे. नुकताच लॉंच करण्यात आलेला iPhone 15 ची निर्मिती भारतात झाली आहे. मेड इन इंडिया आयफोन 15 अमेरिकेसह जागतिक बाजारपेठेत भारतातून निर्यात करण्यात आला होता. मात्र किंमतीचा विचार केला तर मेड इन इंडिया आयफोनचा भारतीयांना फारसा फायदा झाला नाही. भारतात उत्पादन घेऊनही भारतीयांना आयफोन 15 हा इतर देशांच्या तुलनेत 20% नी महाग आहे.
भारतीयांसाठी iPhone महाग कारण…
- आयफोनची भारतात निर्मिती होते म्हणजे जोडणी केली जाते.
- आयफोनसाठी आवश्यक चीप आणि इतर सुटे भाग आयात केले जातात.
- आयात केल्या जाणाऱ्या सुट्या भागांवर 22% आयात शुल्क भरावे लागते.
- अॅपल कंपनी विक्री वाढवण्यासाठी कोणत्याही पार्टनरसोबत डिस्काउंटसाठी करार करत नाही.
- स्थानिक करांमुळे अॅपलचे आयफोन इतर देशांच्या तुलनेत महाग ठरतात.