आर्थिक आघाडीवर निराशाजनक कामगिरी आणि ब्रोकर्स कंपन्यांनी शेअरच्या भविष्याबद्दल कमकुवत अंदाज व्यक्त केल्याने आज सोमवारी 17 एप्रिल 2023 रोजा इन्फोसिसच्या शेअरमध्ये 12.2% घसरण झाली. 2019 नंतर एका दिवसात झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली. यामुळे इन्फोसिसच्या शेअर होल्डर्सचे प्रचंड नुकसान झाले.
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2023 मध्ये व्यावसायिक वृद्धीबाबत सावध अंदाज व्यक्त केले आहे. जगभरात मंदीचा प्रभाव वाढत असल्याने पुढील एक दोन तिमाही आयटी सेवा क्षेत्राला फटका बसेल, असे इन्फोसिसने आपल्या अहवालात म्हटले आहे. अपेक्षेप्रमाणे या अहवालाचे पडसाद शेअर मार्केटमध्ये उमटले. आज बाजार सुरु होताच 'बीएसई'वर इन्फोसिसचा शेअर 12% ने कोसळला. त्याला लोअर सर्किट लागले. इन्फोसिसचा शेअर 1219 रुपयांपर्यंत खाली आला. मागील 12 महिन्यांतील ही नीचांक पातळी ठरली.
राष्ट्रीय शेअर बाजाराच्या मंचावर (NSE) इन्फोसिस 15% ने कोसळला. त्याने 1185.30 रुपयांचा नीचांक गाठला होता. दिवसअखेर तो 1258.30 रुपयांवर बंद झाला. त्यात 9.42% घसरण झाली. बीएसईवर इन्फोसिस 1258.10 रुपयांच्या पातळीवर स्थिरावला.
मागील एक वर्षापासून भारतातील माहिती आणि तंत्रज्ञानातील कंपन्यांना संघर्ष करावा लागत आहे. विशेषत: अमेरिका आणि युरोपातील बँका, विमा कंपन्यांकडून भारतीय आयटी कंपन्यांना चांगला महसूल मिळतो,मात्र रशिया-युक्रेन युद्धानंतर अमेरिका आणि युरोपात मंदी आणि महागाई वाढली आहे. त्यातच अमेरिकेतील दोन बँका तडकाफडकी बंद झाल्या. मंदीने गेल्या सहा महिन्यात बड्या टेक कंपन्यांनी काटकसरीसाठी मनुष्यबळ कपातीचा मार्ग स्वीकारला. हजारो कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. त्यामुळे आयटी सेवेसाठी या कंपन्यांकडून होणारा खर्च देखील कमी केला जाईल, अशी शक्यता आहे. याचा अंदाज घेत टीसीएस, इन्फोसिस यांनी आर्थिक वर्ष 2024 चा महसुलाबाबत सावध अंदाज व्यक्त केला आहे.
इन्फोसिसने आर्थिक वर्ष 2024 मध्ये केवळ 4 ते 7% वृद्धी होईल, असा अंदाज वर्तवला आहे. तज्ज्ञ आणि विश्लेषकांच्या मूळ अंदाजापेक्षा हा खूपच कमी असल्याने गुंतवणूकदारांची आज सपशेल निराशा झाली. मागील पाच वर्षांतील ही सर्वात निराशाजनक कामगिरी असल्याने गुंतवणूकदारांनी बाजार सुरु होताच इन्फोसिसच्या शेअरची चौफेर विक्री केली.
इन्फोसिसला 31 मार्च 2023 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीत 6128 कोटींचा नफा झाला. त्यात 7.8% वाढ झाली. डिसेंबरच्या तिमाहीच्या तुलनेत नफ्यात घसरण झाल्याने ब्रोकर्स कंपन्यांनी चिंता व्यक्त केली आहे. इन्फोसिसला डिसेंबर 2022 च्या तिमाहीत 6586 कोटींचा नफा झाला होता. मार्च 2023 च्या तिमाहीत एकूण महसुलात 16% वाढ झाली असून 37441 कोटी मिळाले असल्याचे कंपनीने म्हटले आहे. मात्र ही कामगिरी प्रत्यक्षातील अंदाजापेक्षा कमीच राहिली. त्यामुळे गुंतवणूकदारांची निराशा झाली.
'IT Index'ची धूळदाण
इन्फोसिसमधील पडझडीची झळ माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इतर कंपन्यांच्या शेअरला देखील बसली. राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टी IT Index मध्ये 7% घसरण झाली होती. बाजार बंद होताना तो 4.7% घसरणीसह 27008.20 अंकांवर बंद झाला.इन्फोसिससह टीसीएस, विप्रो, टाटा एलएक्सी, सोनाटा सॉफ्टवेअर, एचसीएल टेक्नॉलॉजी, ओरॅकल सर्व्हिसेस या शेअरमध्ये 1 ते 7% घसरण झाली. 'बीएसई'वर एलटीआय माइंड ट्री 8%, पर्सिस्टंट सिस्टम 8.17%, टेक महिंद्रा 7.30%, एल अॅंड टी टेक्नॉलॉजीज सर्व्हिसेस 5.99%, कॉफॉर्ज 5.82%, झेंसर टेक्नॉलॉजी 5%, एचसीएल टेक्नॉलॉजी 4.79%, इन्फो एज 4.83%, एम्फासिस 4.24% ची घसरण झाली.