माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील इन्फोसिसच्या शेअरमधील घसरणीने गुंतवणूदार चिंतेत आहेत. वर्ष 2023 मध्ये इन्फोसिसचा शेअर 12% घसरला आहे. जगभरात आयटी क्षेत्रावर मंदीचा प्रभाव आहे. टीसीएस, इन्फोसिस या कंपन्यांनी महसुली अंदाज कमी केला आहे. त्यामुळे इन्फोसिसचा शेअर पुढे कशी वाटचाल करणार याची चिंता गुंतवणूकदारांना सतावत आहे.
शेअर मार्केटमध्ये आठवडाभरात मोठी घसरण झाली होती. याची झळ इन्फोसिसच्या शेअरला देखील बसली. शुक्रवारी 28 जुलै 2023 रोजी बाजार बंद होताना इन्फोसिसचा शेअर 1340.35 रुपयांवर स्थिरावला होता. त्यात 0.92% घसरण झाली. 52 आठवड्यांचा विचार केला तर इन्फोसिसच्या शेअरने 1672.45 रुपयांचा उच्चांकी स्तर गाठला असून 1215.45 रुपयांची नीचांकी पातळी गाठली होती.
वर्ष 2023 मध्ये इन्फोसिसच्या शेअरमध्ये 12% हून अधिक घसरण झाली आहे. कंपनीने नुकताच जाहीर केलेल्या तिमाही निकालात महसुली उद्दिष्ट 3.5% कमी करुन 1% इतके केले होते.
शेअर बाजार विश्लेषक आणि ब्रोकर्स कंपन्यांच्या अभ्यासानुसार इन्फोसिससाठी 1300 रुपयांची पातळी अत्यंत महत्वाची आहे. गुंतवणूकदारांनी 1250 रुपयांचा स्टॉप लॉसवर 1450 रुपयांचे टार्गेट ठेवावे, असा अंदाज व्यक्त केला आहे.
इन्फोसिसच्या निराशाजनक तिमाही निकालानंतर शेअरमध्ये सातत्याने घसरण दिसून आली. इन्फोसिसचा शेअर 1500 रुपयांवरुन 1300 रुपयांपर्यंत खाली आल्याचे जीसीएल ब्रोकिंगचे संशोधक वैभव कौशिक यांनी सांगितले. ते म्हणाले की सध्याचा शेअरचा भाव गुंतवणुकीच्या दृष्टीने योग्य आहे.
शेअर इंडियाचे शेअर बाजार विश्लेषक रवी सिंग यांच्यामते इन्फोसिसवर सध्या विक्रीचा दबाव आहे. याचे मुख्य कारण म्हणजे कंपनीची आर्थिक आघाड्यांवरील निराशाजनक कामगिरी आहे. आयटी क्षेत्रातला ट्रेंड पाहता इन्फोसिस नजीकच्या काळात 1300 रुपयांच्या पातळीखाली येऊ शकतो.
आनंद राठी शेअर्सचे वरिष्ठ व्यवस्थापक गणेश डोंगरे यांनी इन्फोसिसबाबत गुंतवणूकदारांना खरेदीचा सल्ला दिला आहे. मागील आठवडाभराची इन्फोसिसच्या शेअरची कामगिरी बघितली तर त्याचा 200 डीएमए हा 1270 रुपयांच्या आसपास आहे. आताच्या किंमतीवर नव्याने गुंतवणूक करणाऱ्यांसाठी संधी आहे. त्यांनी 1220 ते 1250 या दरम्यान स्टॉप लॉस लावावा, असा सल्ला त्यांनी दिला.
(डिसक्लेमर : शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. 'महामनी' शेअर्सच्या खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)