माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील दिग्गज कंपनी इन्फोसिसला एप्रिल ते जून या तिमाहीत 5945 कोटींचा नफा झाला. यंदा नफ्यात 10.9% वाढ झाली. मात्र कंपनीची ही कामगिरी बाजाराच्या अपेक्षेपेक्षा समाधानकारक नसल्याने त्याचे पडसाद शेअरवर उमटले. आज इन्फोसिसचा शेअर 1.73% ने घसरला.
इन्फोसिसने आज गुरुवारी 20 जुलै 2023 रोजी पहिल्या तिमाहीची आर्थिक आकडेवारी जाहीर केली. कंपनीला 5945 कोटींचा नफा झाला. या तिमाहीत कंपनीला 37933 कोटींचा महसूल मिळाला असून त्यात 10% वाढ झाली. गेल्या वर्षी याच तिमाहीत इन्फोसिसला 34470 कोटींचा नफा झाला होता. विश्लेषकांनी यंदा इन्फोसिसची 14 ते 18% ने वाढ होईल असा अंदाज व्यक्त केला होता. मात्र प्रत्यक्षात कंपनीची कामगिरी तिथपर्यंत पोहोचली नाही.
पहिल्या तिमाहीत इन्फोसिसला 2.3 बिलियन डॉलर्सची मोठी कंत्राटे मिळाली आहेत. मात्र संपूर्ण वर्षासाठी महसुलाचा अंदाज कंपनीने कमी केला आहे. आर्थिक वर्ष 2024 साठी कंपनीने आता 1 ते 3.5% असा सुधारित अंदाज व्यक्त केला आहे. याआधी कंपनीने महसूल वृद्धी 4 ते 7% होईल, असा अंदाज वर्तवला होता.आजच्या सत्रात इन्फोसिसचा शेअर 1.73% घसरला. दिवसअखेर तो 1448.85 रुपयांवर स्थिरावला.
तिमाही निकालांवर इन्फोसिसचे सीईओ सलिल पारेख म्हणाले की पहिल्या तिमाहीत मोठ्या कंत्राटांमुळे कंपनीसाठी पहिली तिमाही चांगली राहिली. आर्टिफिशीअल इंटिलिजन्समध्ये कंपनीने चांगला विस्तार केला. पहिल्याच तिमाहीत कंपनीचे 80 अॅक्टिव्ह क्लाइंट आहेत. उर्वरित नऊ महिन्यात यात वाढ होईल, असा आशावाद सलिल पारेख यांनी व्यक्त केला.