Health Care Inflation: देशात कोरोनानंतर आरोग्य क्षेत्रातील महागाईने उच्चांक गाठला आहे. रुग्णालयाचे बील सर्वसामान्य नागरिकांचे खिसे रिकामे करत असतानाच बड्या हॉस्पिटल्सच्या उत्पन्नांत मोठी वाढ झाल्याचं आकडेवारीतून दिसून येत आहे. रुग्णालयाचे उत्पन्न काढताना प्रति खाटेमागे दिवसाचे उत्पन्न आणि रुग्ण किती दिवस भरती होता? हे महत्त्वाचे घटक आहेत.
देशातील बड्या हॉस्पिटल्सच्या अनेक प्रमुख शहरांत शेकडो शाखा आहेत. (Hospital per bed income) यातील प्रति खाटेमागील उत्पन्न वाढले आहे. तर रुग्णालयात पेशंट अॅडमिट असण्याचा कालावधी कमी झाल्याने व्यवस्थापन खर्च खाली आला आहे. हे दोन्ही घटक रुग्णालयांच्या नफ्यासाठी फायद्याचे ठरले आहेत.
वरील दोन्ही घटक रुग्णालयासाठी फायद्याचे असले तरी सर्वसामान्य ग्राहकांचा खिसा रिकामा करणारे आहेत. यातून आरोग्य विम्याची गरज अधोरेखित होते. विमा नसल्यास रुग्णालयातील खर्च तुमचं दिवाळं काढू शकतो. आरोग्य विमा तुम्हाला मोठ्या अडचणीपासून वाचवू शकतो. अगदी दोन-तीन दिवस भरती असाल तरीही हा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
आरोग्य क्षेत्रातील महागाईचा दर
2021 साली आरोग्य क्षेत्रातील महागाईचा दर 14% होता. त्यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. अपोल हॉस्पिटलच्या देशात सर्वाधिक शाखा आहेत. प्रति खाटेमागे 2020 साली उत्पन्न 37,397 इतके होते. त्यात चालू वर्षाच्या पहिल्या तिमाहीत वाढ होऊन 57,760 रुपये इतके झाले आहे. पुढील काही महिन्यात प्रति खाटेमागे उत्पन्न 60 हजारांपर्यंत पोहचण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
महागाईचा भार ग्राहकांच्या माथी
कच्च्या माल, वैद्यकीय उपकरणे, दैनंदिन वापराच्या वस्तू, कर्मचाऱ्यांचे पगार याचा खर्च वाढला आहे. हा सगळा खर्च रुग्णालयांनी ग्राहकांच्या अंगावर टाकला आहे. वैद्यकीय क्षेत्राच्या महागाईची भर यात आहे. विम्याचे प्रमाण वाढल्यानेही रुग्ण चांगल्या सुविधांचा उपभोग घेत आहेत, याचा सकारात्मक परिणाम रुग्णालयाच्या उत्पन्नावर झाला आहे.
रुग्णालयातील मोठ्या सर्जरींचा खर्च वाढला आहे. तसेच ऑपरेश करताना ज्या गोष्टी वापरून फेकून देण्यात येतात, त्याचा खर्चही वाढला आहे. कापूस, कॅथेडर, इंजेक्शन, हातमोजे, मास्क याचा खर्च वाढला आहे. एकूण रुग्णालयातील बिलापैकी 15% खर्च कन्झ्युमेबलचा होत आहे.