कोणी घर देत का? घर?... या नटसम्राट चित्रपटातील संवादासारखी सामान्य माणसाची घर घेण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली आहे. घराचे भाव वाढले असून बँका लोनमध्ये सातत्याने वाढ करत आहे. या पार्श्वभूमीवर नाइट फ्रँक इंडिया या आघाडीच्या प्रॉपर्टी कन्सल्टंट कंपनीने नाइट फ्रँक अफोर्डेबिलिटी इंडेक्स जारी केला आहे. यात त्यांनी 8 शहराची निवड केली आहे. या इंडेक्सध्ये एखाद्या शहरात घर घेण्यासाठी एकूण उत्पन्नापैकी किती टक्के EMI भरावा लागतो, त्यावरून त्या शहराची अफोर्डेबिलिटी ठरते. चला तर इंडेक्सनुसार कोणते शहर घरांसाठी स्वस्त आणि महाग आहे ते पाहूया.
अहमदाबाद सर्वात स्वस्त शहर
नाइट फ्रँक अफोर्डेबिलिटी इंडेक्स 2023 नुसार टाॅप 8 शहरांमध्ये घरांसाठी सर्वांत स्वस्त शहर अहमदाबाद ठरले आहे. या शहरात घर घ्यायचे असल्यास, तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या 23 टक्के EMI मध्ये खर्च करावे लागणार आहेत. तेच कोलकाता अफोर्डेबिलिटीच्या यादीत 2 नंबरवर आहे. या ठिकाणी तुम्हाला घर घ्यायचे असल्यास, तुमच्या उत्पन्नाच्या 26 टक्के रक्कम EMI साठी लावून ठेवावी लागणार आहे. हीच परिस्थिती पुण्याची सुद्धा आहे. तुम्हाला पुण्यात घर घ्यायचे असल्यास 26 टक्के EMI मध्ये खर्च करावा लागणार आहे. तर चेन्नई आणि बेंगळूरूमध्ये घर खरेदी करायचा विचार करत असल्यास, तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या 28 टक्के EMI भरावा लागणार आहे.
मुंबई घरांसाठी सर्वांत महाग
घर मुंबईत खरेदी करण्याचा विचार करत असल्यास, थोडा विचार करावा लागणार आहे. कारण, या इंडेक्सनुसार मुंबईत घर खरेदी करणे सर्वांत महागडे आहे. तुम्हाला मुंबईत घर खरेदी करायचे असल्यास, तुमच्या उत्पन्नाच्या 55 टक्के EMI भरावा लागणार आहे. म्हणजे जेवढे पैसे तुम्ही कमवता त्याच्या अर्ध्यापेक्षा जास्त रकमेचा हप्ता तुम्हाला भरावा लागणार आहे. त्यांतर सर्वांत महागड्या शहराच्या यादीत दुसरा नंबर हैदराबाद शहराचा आहे. या शहरात घर घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या उत्पन्नाच्या 31 टक्के EMI चा हप्ता द्यावा लागणार आहे. तर या यादीत दिल्लीचा तिसरा नंबर लागतो. या ठिकाणी तुम्हाला हैदराबादच्या खालोखाल म्हणजेच 30 टक्के EMI साठी खर्च करावे लागणार आहे.
घरांच्या विक्रीत झाली घट
रिपोर्टनुसार, गेल्या वर्षापासून या शहरांमध्ये राहणे महाग झाले आहे. या शहरांच्या EMI आणि गुणोत्तरात 1-2 टक्क्यांची वाढ झाली आहे. तसेच, भारतीय रिझर्व्ह बँकेने गेल्या वर्षीपासून 250 बेसिस पॉइंट्सने आपल्या प्रमुख कर्जदरात वाढ केली आहे. यामुळे या शहरांच्या EMI मध्ये तेव्हापासून सरासरी 14.4% ने वाढ झाली आहे. तसेच, या वाढीचा फटका 50 लाख किमतींच्या घरांना जास्त बसला असून त्यांच्या विक्रीत घट झाली आहे. कारण, या कॅटेगरीत घर घेण्यासाठी गृहकर्जावर अवलंबून राहावे लागते. पण, अधिक EMI असलेले गृहकर्ज परवडत नसल्याने, घर खरेदी करणे कमी झाले असल्याचे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.