भारताच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचे 20.19 टक्के योगदान आहे. तर दुसरीकडे कृषी उत्पन्नाचा महागाईच्या दरावरही थेट परिणाम होतो. त्यामुळे देशात प्रत्येक पीक हंगामात होणाऱ्या लागवडीचा आणि उत्पन्नाचा थेट परिणाम भारताच्या अर्थव्यवस्थेवर होतो. दरम्यान, गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या खरीप (kharif crop) हंगामात देशात एकूण लागवडीखालील क्षेत्रामध्ये वाढ झाली आहे. यामध्ये ऊस आणि भात लागवडीच्या क्षेत्रफळामध्ये देखील वाढ दिसून आली आहे.
979.88 लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड
सुरुवातीच्या काळात मान्सून उशीरा दाखल झाल्यामुळे देशात खरीप हंगामातील लागवडीचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत 24 % कमी दिसून येत होते. मात्र, मान्सून पावसाचे सर्वत्र आगमन झाल्यानंतर खरीपाखालील लागवडीच्या क्षेत्रफळामध्ये वाढ झाली आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, यंदा देशात आतापर्यंत 979.88 लाख हेक्टरवर खरीप पिकांची लागवड करण्यात आली आहे. गेल्यावर्षी हे क्षेत्र 972.58 लाख हेक्टर इतके होते.
तेलबियांचीही लागवड वाढली-
खरीप हंगामात एकूण लागवडीखालील क्षेत्रामध्ये भाताची लागण 328.22 लाख हेक्टरवर झाली आहे. तर 56 लाख हेक्टर ऊसाची लागवड झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत भात आणि ऊसाच्या लागवडीखालील क्षेत्रामध्ये यंदा 1 ते 2 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचबरोबर तब्बल 113 लाख हेक्टर क्षेत्रावर डाळींची आणि 184 लाख हेक्टरवर भुईमूग, सोयाबीन, सूर्यफूल, तीळ आणि इतर तेलबियांची लागवड करण्यात आलेली आहे.
अन्नधान्याच्या किमती नियंत्रणात
भारतात एकूण अन्नधान्यांच्या पिकांच्या उत्पादनापैकी जवळपास 50% उत्पादन हे खरीप हंगामात होते. यंदा हंगामातील लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनात वाढ झाल्यास अन्नधान्याच्या किमती स्थिर राहण्यास मदत होणार आहे. तसेच महागाई दरही नियंत्रणात राहण्यास मदत होऊ शकते.
..तर तांदुळ उत्पादकांना फायदा
केंद्र सरकारने अन्नधान्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. यामध्ये तांदुळ निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात तांदळाच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. दरम्यान, यंदा खरीपामध्ये तांदळाच्या लागवडीचे क्षेत्र वाढले असनू चांगले उत्पादन झाल्यास आणि निर्यात बंदी उठवल्यास शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होऊ शकतो.