Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

GDP Growth: आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत GDP ची वाढ 7.8 टक्के; अपुऱ्या मान्सूनमुळे वाढ खुंटणार का?

GDP in Q1 Of FY24

Image Source : www.businesstoday.in

चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदवली आहे. मात्र, अपुऱ्या पावसामुळे भविष्यात विकासदर खुंटण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ऑगस्ट महिन्यात 122 वर्षातील सर्वात कमी पाऊस पडल्याचे हवामान विभागाने सांगितले. पहिल्या तिमाहीतील वाढीचा वेग यापुढे राखता येईल का?

GDP Growth: मागील सलग चार तिमाहीपैकी चालू वर्षातील पहिल्या तिमाहीत विकासदर (GDP) सर्वात जास्त राहिल्याचे सरकारी आकडेवारीतून समोर आले आहे. 2024 आर्थिक वर्षातील पहिल्या (एप्रिल-जून) तिमाहीत GDP 7.8% राहिला. राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीतून ही माहिती समोर आली. दरम्यान, अपुऱ्या मान्सूनमुळे ही वाढ खुंटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

विकासदर वाढण्यामागील कारणे काय?

केंद्र आणि विविध राज्य सरकारांनी भांडवली खर्चात मोठी वाढ केली. वस्तू आणि सेवांची वाढलेली मागणी आणि अर्थव्यवस्थेतील विविध क्षेत्रांतील तेजी वाढीमागील प्रमुख कारण आहे. मागील आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीचा विचार करता नॉमिनल GDP मध्ये 8 टक्क्यांनी वाढ झाली. 

क्षेत्रनिहाय वाढ 

जेथे ग्राहक आणि उद्योगाचा थेट संबंध येतो असे क्षेत्र म्हणजे व्यापार, हॉटेल्स, वाहतूक क्षेत्रातील उद्योगांनी 9.2% वाढ नोंदवली. 

मागील वर्षाच्या पहिल्या तिमाहीच्या तुलनेत रिअल इस्टेट क्षेत्राची वाढ 12.2% झाली. बांधकाम, खाणकाम आणि निर्मिती क्षेत्रातही प्रगती झाली. 

कृषी आणि ऊर्जा क्षेत्रात तुलनेने कमी वाढ झाली. नागरिकांच्या उपभोग्य वस्तुंचा एकूण जीडीपीतील वाटा 57.3% राहिला. मागील वर्षापेक्षा यात 6 टक्क्यांनी वाढ झाली. 

पहिल्या तिमाहीचा विकासदर 8 टक्के राहील, असा अंदाज RBI ने वर्तवला होता. मात्र, त्यापेक्षा कमी वाढ झाली. 2023 आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी-मार्च तिमाहीत विकासदर 6.1 टक्के होता. तर संपूर्ण FY23 चा विकासदर 7.2 टक्के होता. 

सकारात्मक आणि नकारात्मक घटक कोणते?

सेवांची मागणी, विविध क्षेत्रांत वाढलेली गुंतवणूक आणि वस्तुंच्या कमी झालेल्या किंमती पहिल्या तिमाहीसाठी सकारात्मक ठरल्या. (GDP Growth Q1 of FY24) तर अवकाळी पाऊस, व्याजदर वाढीचा परिणाम, जागतिक बाजारातील रोडावलेली मागणी या काही नकारात्मक बाबींचा विकासदरावर परिणाम झाला. 

भांडवली खर्चातील वाढ 

केंद्र सरकारने चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत एकूण अर्थसंकल्पाच्या 27.8% रक्कम खर्च केल्याचा अंदाज आहे. तर विविध राज्य सरकारांनी 12.7 टक्के रक्कम खर्च केली. वार्षिक आकडेवारीचा विचार करता मागील वर्षापेक्षा केंद्र आणि राज्यांनी भांडवली खर्चात 59.1 आणि 76% वाढ केली. 

मान्सूनचा नकारात्मक परिणाम होणार?

दरम्यान, पहिल्या तिमाहीत अर्थव्यवस्थेने चांगली वाढ नोंदवली असली तरी अपुऱ्या मान्सूनमुळे विकासदर रोडावण्याची भीती निर्माण झाली आहे. (weak Monsoon impact on GDP) चालू मान्सूनमध्ये "सर्वसाधारणपेक्षा कमी" पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात 36% कमी पाऊस हा 122 वर्षातील सर्वात कमी पाऊस ठरला. 

वातावरणीय घटक एल-निनोमुळे कमी पावसाची शक्यता वर्तवली आहे. कृषी क्षेत्राचा अर्थव्यवस्थेतील प्रत्येक क्षेत्रावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. जर यापुढेही पाऊस पुरेसा झाला नाही तर खरीप आणि रब्बी हंगामातील पिके धोक्यात येतील. सध्या कमी पावसामुळे महाराष्ट्रातील तूर, सोयाबीनसह इतर पिकांनी माना टाकल्या आहेत.