अनेक दशकांपासून ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे तिकिटात मिळणारी सवलत (Railway concession to senior citizens) कायमची बंद करण्याचे संकेत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रसार झाल्यानंतर ज्येष्ठ नागरिकांना दिली जाणारी सवलत तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, आता त्याचा नागरिकांना विसर पडला की काय असे वाटते? रेल्वे खात्यावरील वाढत्या खर्चाच्या बोज्यामुळे ही सवलत पुढील काळात कदाचित सुरू ठेवता येणार नाही, असे अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. ज्येष्ठ नागरिकांना रेल्वे खात्याने मोठा झटकाच दिला आहे.
ज्येष्ठ नागरिकांनी किती सवलत मिळत होती?
रेल्वेच्या आधीच्या नियमानुसार ६० वर्षांपुढील ज्येष्ठ नागरिकांमध्ये महिलांना 50% तर पुरुषांना 40% तिकिटावर सवलत मिळत होती. मात्र, आता ही सवलत बंद होण्याचे संकेत रेल्वे मंत्र्यांनी दिले आहेत. कोरोनाचा प्रसार झाल्यानंतर ही सूट तात्पुरती बंद करण्यात आली होती. मात्र, आती कायमची बंद ठेवण्याचे संकेत रेल्वे खात्याने दिले आहेत.
रेल्वेच्या खर्चवाढीमुळे सवलत देता येणार नाही
मागच्या वर्षी रेल्वे मंत्रालयाने 59 हजार कोटी रुपयांचे अनुदान प्रवाशांच्या विविध सेवांसाठी दिले. सोबतच रेल्वे खात्यातील कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचाऱ्यांच्या पगारावर होणार खर्च खूप मोठा असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना ही सवलत कदाचित पुन्हा देता येणार नाही, असे रेल्वे मंत्री वैष्णव यांनी लोकसभेत सांगितले. महाराष्ट्रातील खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना अश्विन वैष्णव यांनी माहिती दिली.
मागील वर्षी रेल्वेने प्रवासी सेवांवर 59 हजार कोटी रुपयांची जी रक्कम दिली ती काही राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मोठी आहे. रेल्वे खात्याचे वार्षिक भविष्य निर्वाह निधी बिल 60 हजार कोटींचे आहे, तर कर्मचाऱ्यांच्या पगाराचे बील 97 हजार कोटी रुपये आहे. रेल्वेसाठी लागणाऱ्या इंधनावर वार्षिक सुमारे 40 कोटी रुपये खर्च होतो. त्यामुळे कदाचित पुन्हा ज्येष्ठ नागरिकांना सवलत देता येणार नाही, असे रेल्वे मंत्री म्हणाले.
रेल्वेच्या अवस्था पाहा
येत्या काळात प्रवाशांना नव्या सुविधा देण्यात येतील. त्याबाबत आम्ही निर्णय घेऊ. सगळ्यांनी भारतीय रेल्वेची जी अवस्था झाली आहे त्याकडे पाहा, असेही वैष्णव म्हणाले.
राम मंदिराला देशाच्या कानाकोपऱ्याशी रेल्वेने जोडणार
अयोध्यातील राम मंदिर रेल्वेने देशातील कानाकोपऱ्याशी जोडण्यात येईल. राम मंदिराचे काम पूर्ण झाल्यावर या प्रकल्पावर काम करण्यात येईल, असे वैष्णव म्हणाले. देशातील 41 महत्त्वाच्या रल्वे स्थानकांच्या पुनर्विकासाचे काम सुरू असून इतर स्थानकांचा विकास टप्प्याटप्प्याने करण्यात येईल, असे वैष्णव म्हणाले.
लांब पल्ल्याच्या वंदे भारत गाड्या ते हाड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे
सध्या वंदे भारत रेल्वे गाड्यांमध्ये फक्त बैठक व्यवस्था असून 500 ते 550 किमी पर्यंतच्या अंतरापर्यंत या रेल्वे धावतात. मात्र, स्लीपर कोच बसवल्यानंतर यापेक्षाही जास्त अंतर वंदे भारत रेल्वे गाड्या कापतील, असे वैष्षव म्हणाले. 2030 पर्यंत भारतीय रेल्वे प्रदूषणरहित बनवण्याचे उद्दिष्ट आहे. हायड्रोजनवर चालणाऱ्या रेल्वे डिझाइन करण्याचे काम सुरू असून भारतीय अभियंतेच हे काम करणार असल्याचे ते म्हणाले.