GDP देशामध्ये ठराविक कालावधीत उत्पादित वस्तू आणि सेवांच्या एकूण मूल्याविषयी जाणीव करून देते. जीडीपी वाढीचा दर चालू आर्थिक वर्षात 2021-22 मध्ये 8.7 टक्क्यांवरून 7 टक्के इतका राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
उत्पादन आणि खाण क्षेत्राच्या मागणीतील मंदीमुळे देशाचा आर्थिक विकास दर चालू आर्थिक वर्षात 8.7 टक्क्यांवरून वार्षिक 7 टक्क्यांपर्यंत घसरण्याची शक्यता आहे. असे झाल्यास भारताचा आर्थिक विकास दर सर्वात वेगवान असलेल्या देशाचा दर्जा गमावू शकतो. सौदी अरेबिया याला मागे टाकू शकतो,. त्यांचा विकास दर 7.6 टक्के असण्याचा अंदाज आहे
राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाने (NSO) शुक्रवारी जाहीर केलेल्या राष्ट्रीय उत्पन्नाच्या पहिल्या अंदाजात ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मात्र, हा दर RBI च्या 6.8% च्या अंदाजापेक्षा जास्त आहे. 2021-22 मध्ये GDP वाढीचा दर 8.7% इतका होता.
NSO नुसार, नाममात्र GDP (बाजारात किंवा सध्याच्या किमतींनुसार एका वर्षात उत्पादित वस्तू आणि सेवांचे मूल्य) देखील 2022-23 घसरेल. 2021-22 मध्ये हा आकडा 19.5 टक्के होता. आकडेवारीनुसार, चालू आर्थिक वर्षात उत्पादन क्षेत्राचे उत्पादन 1.6 टक्क्यांनी घसरण्याची अपेक्षा आहे. 2021-2022 मध्ये 9.9 टक्के इतकी वाढ झाली. त्याचप्रमाणे, खाण क्षेत्रातील उत्पादन वाढीचा दर मागील आर्थिक वर्षात 11.5 टक्क्यांवरून 2.4 टक्क्यांवर घसरण्याची शक्यता आहे.
Indian Economy मध्ये होऊ शकते ‘इतकी’ वाढ
GDP चालू आर्थिक वर्षात 36.43 लाख कोटी रुपयांनी वाढून 273.08 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचू शकतो. 2021-22 मध्ये हा आकडा 236.65 लाख कोटी होता.
चालू आर्थिक वर्षात कृषी क्षेत्रातील उत्पादनाचा दर 3 टक्क्यांवरून 3.5 टक्क्यांपर्यंत वाढेल. वाहतूक, हॉटेल आणि दळणवळण क्षेत्राचा विकास दर 11.1 टक्क्यांवरून 13.7 टक्क्यांपर्यंत वाढेल.आर्थिक, रिअल इस्टेट आणि व्यावसायिक सेवांचा विकास दर 4.2 टक्क्यांवरून 6.4 टक्क्यांपर्यंत वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
याचवेळी बांधकाम क्षेत्राचा विकास दर 11.5 टक्क्यांवरून 9.1 टक्क्यांपर्यंत खाली येऊ शकतो. सार्वजनिक प्रशासन, संरक्षण आणि इतर सेवांचा विकास दर 7.9% पर्यंत खाली येऊ शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.