Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

India Shelter Finance आयपीओ आणणार; कंपनीचा 2000 कोटी रुपये उभारण्याचा मानस

India Shelter Company's Upcoming IPO

Upcoming IPO: भारतातील 15 राज्यांमध्ये कार्यरत असलेली India Shelter Finance ही घरांसाठी कर्ज देणारी कंपनी 2000 कोटी रुपयांचा आयपीओ आणत आहे. कंपनीच्या देशभरात 180 शाखा आहेत.

Upcoming IPO: इंडिया शेल्टर फायनान्स (India Shelter Finance) ही घरांसाठी कर्ज देणारी कंपनी आयपीओ आणण्याच्या तयारीत आहे. कंपनी आयपीओच्या माध्यमातून सुमारे 2000 कोटी रुपये उभे करणार आहे. या कंपनीमध्ये Westridge Capital आणि Nexus Ventures Partners या कंपन्यांची गुंतवणूक आहे.

इंडिया शेल्टर फायनान्स ही कंपनी पूर्वी सत्यप्रकाश हाऊसिंग फायनान्स इंडिया लिमिटेड या नावाने ओळखली जात होती. या कंपनीने आतापर्यंत 60 हजार कुटुंबांना घर देण्यासाठी कर्ज दिले आहे. कंपनीच्या भारतातील जवळपास 15 राज्यांमध्ये 180 शाखा आहेत. कंपनीने भविष्यातील योजनांचा विस्तार लक्षात घेऊन आयपीओच्या माध्यमातून 2000 कोटी रुपये उभारण्याचा मानस व्यक्त केला आहे.

ऑफर फॉर सेल योजनाही ओपन

इंडिया शेल्टर कंपनी आयपीओ बरोबरच ऑफर फॉर सेल (Offer for Sale-OFS) ही स्कीमसुद्धा आणणार आहे. ऑफर फॉर सेलच्या माध्यमातून काही गुंतवणूकदारांनी आपला हिस्सा विकण्याची तयारी दर्शवली आहे. इंडिया शेल्टर फायनान्सने आपल्या आयपीओमधील गुंतवणुकीसाठी ICICI Securities, Kotak Mahindra Capital आणि CITI Bank यांची निवड केली आहे.

IPO म्हणजे काय?

निधी उभारण्यासाठी आयपीओ प्रक्रिया कंपन्यांना फायदेशीर असतं. शिवाय यात पारदर्शकताही अधिक असते. शेअर बाजारात नोंदणी नसलेली म्हणजेच असूचीबद्ध कंपनी जेव्हा ती प्रथमच लोकांसाठी सिक्युरिटीज किंवा शेअरच्या विक्रीद्वारे निधी उभारण्याचा निर्णय घेते तेव्हा प्रारंभिक सार्वजनिक ऑफर (Initial Public Offering  - IPO) जाहीर करते. स्टॉक एक्स्चेंजवर सूचीबद्ध झाल्यानंतर, कंपनी सार्वजनिकरित्या व्यापार करणारी कंपनी बनते आणि कंपनीचे शेअर्स खुल्या बाजारात मुक्तपणे व्यवहार करता येतात.

60 हजार कुटुंबांना कर्जाचे वाटप

इंडिया शेल्टर कंपनीने स्वस्तात घर विकत देणाऱ्या योजनांमधील कुटुंबियांना मोठ्या प्रमाणात कर्ज उपलब्ध करून दिले आहे. कंपनीने जवळपास 60 हजार कुटुंबांना घरासाठी कर्ज मिळवून दिले आहे. कंपनीने आतापर्यंत जवळपास 4000 कोटी रुपयांच्या कर्जाचे वाटप केले आहे. यात प्रामुख्याने स्वस्तात घर विकत घेणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक आहे.

स्वस्त घरांसाठी कर्ज देण्यावर कंपनीचा भर

इंडिया शेल्टर कंपनीच्या देशभरात 180 शाखा असून, कंपनी मागील 13 वर्षांपासून स्वस्त घरांसाठी कर्ज उपलब्ध करून देत आहे. कंपनीने स्वस्त घर योजनांवर लक्ष केंद्रीत करून, अशी घरे विकत घेणाऱ्या ग्राहकांना कर्ज उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. सध्या कंपनी नवीन घर विकत घेण्यासाठी, घराचे नुतनीकरण करण्यासाठी, घर अपग्रेड करण्यासाठी आणि संपत्ती गहाण ठेवून त्यावर कर्ज देत आहे.

इंडिया शेल्टरच्या महाराष्ट्रात 27 शाखा

इंडिया शेल्टर कंपनीच्या वेबसाईटवर उपलब्ध असलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये एकूण 27 शाखा कार्यरत आहेत. कंपनी घराच्या कर्जासाठी 5 लाखापासून 50 लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देते.

(डिसक्लेमर: शेअर मार्केट किंवा आयपीओमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सेबी अधिकृत अर्थतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. या बातमीद्वारे वाचकांना फक्त माहिती दिली जात आहे. ‘महामनी’ वेबपोर्टल शेअर्स आणि आयपीओ खरेदी-विक्रीचा सल्ला देत नाही.)        

Source: www.moneycontrol.com