तुम्ही तुमच्या घर खरेदीसाठी जर होम लोन घेतलं असेल किंवा घर गहाण ठेऊन कुठल्या स्वरूपाचे कर्ज घेतले असेल तर ही बातमी तुम्ही वाचलीच पाहिजे. याचे कारण म्हणजे ज्या बँका ग्राहकांनी संपूर्ण कर्ज फेडल्यानंतरही मालमत्तेची कागदपत्रे परत देण्यास दिरंगाई करत असतील तर आता त्यांच्यावर थेट आरबीआय कारवाई करणार आहे.
होय, रिझर्व बँक ऑफ इंडियाने याबाबत कर्जदार ग्राहकांच्या बाजूने एक निर्णय घेतला आहे. ज्या बँका आणि वित्तीय संस्था ग्राहकांना कर्ज देताना त्यांच्याकडून त्यांच्या मालमत्तेची कागदपत्रे घेतात त्यांना या कागदपत्रांची संपूर्ण जबाबदारी घ्यायची असते. ही कागदपत्रे गहाळ होणार नाहीत, चोरी होणार नाहीत, त्यांचे कुठल्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची संपूर्ण जबाबदारी बँकांची असते. त्याचसोबत कर्जाची संपूर्ण परतफेड केल्यानंतर ही कागदपत्रे ग्राहकांना 30 दिवसांच्या आत परत करणे अनिवार्य असल्याचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने म्हटले आहे.
RBI कडे आल्या होत्या तक्रारी
बँकांच्या दिरंगाईमुळे अनेक ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत होता. याबाबत आरबीआयकडे देशभरातून तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. या तक्रारींवर निर्णय घेताना आरबीआयने एक आदेश जारी केला असून, त्यानुसार कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांत ग्राहकांना त्यांची मालमत्तेची कागदपत्रे मिळणे बंधनकारक असल्याचे आरबीआयने म्हटले आहे.
Responsible Lending Conduct – Release of Movable / Immovable Property Documents on Repayment/ Settlement of Personal Loanshttps://t.co/zyUFHP36Gl
— ReserveBankOfIndia (@RBI) September 13, 2023
आदेशाची पत्र सर्व बँकांना रवाना
हा निर्णय केवळ सार्वजनिक क्षेत्रातील आणि खासगी क्षेत्रातील बँकांसाठी मर्यादित नसून, देशभरात ज्या हाउसिंग फायनान्स कंपन्या कार्यरत आहेत त्यांनासुद्धा या निर्णयाचे पालन करावे लागणार आहे. याशिवाय सहकारी बँका, प्रादेशिक बँका,एनबीएफसी यांना देखील या निर्णयाचे पालन करावे लागणार आहे. त्यामुळे तुम्ही कर्ज कुठल्याही बँकेतून घेतले असेल तरीही हा नियम देशभरातील सर्वच प्रकारच्या बँकांना लागू आहे हे विसरू नका.
दंडात्मक कारवाई काय?
ज्या बँका ग्राहकांना कर्जाची परतफेड केल्याच्या 30 दिवसांत त्यांची कागदपत्रे परत करण्यास अयशस्वी ठरतील अशा बँकांना प्रत्येक दिवसासाठी 5 हजार रुपयांचा दंड भरपाई म्हणून ग्राहकांना द्यावा लागेल असे देखील आरबीआयने आपल्या आदेशात म्हटले आहे.