विमा घेताना प्रत्येकजण भविष्यात होणाऱ्या आर्थिक खर्चापासून संरक्षण मिळावे हाच उद्देश समोर ठेवतो. विमा कंपन्यांकडून अनेक प्रकारच्या विमा पॉलिसी उपलब्ध करून दिल्या जातात. त्यापैकी सर्वसमावेशक अशा विमा घेण्यास ग्राहक प्राधान्य देतात. मात्र, काहीवेळा कंपन्यांकडून विमा पॉलिसी धारकांची फसवणूक होण्याचे प्रकार घडतात. काही वेळा विमा कंपन्यांकडून नियमबाह्यपणे क्लेम नाकारल्याने पॉलिसीधारकास मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसतो. अशा वेळी विमा कंपनी विरोधात तक्रार कुठे करायची याबाबती माहिती जाणून घेऊयात..
तक्रार कशासाठी?
विमा खरेदी करत असताना कंपनी आणि पॉलिसी घेणाऱ्यामध्ये एक प्रकारचा करार झालेला असतो. मात्र, काही वेळा कंपनीकडून नियमबाह्यपणे ग्राहकांना सेवा देण्यास असमर्थता दाखवली जात असेल, दावा दाखल करण्यास अथवा मंजुर करण्यास विलंब करणे, किंवा विम्याचा दावा नाकारला जात असेल किंवा दाव्याशी संदर्भात तुमची काही तक्रार असेल तर तुम्हाला संबंधित विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करता येते. तुम्ही पुढील वेगवेगळ्या पद्धतीने संबंधित विमा कंपनीच्या विरोधात तक्रार दाखल करू शकता..
तक्रार निवारण अधिकाऱ्यांशी संपर्क-
जर तुम्हाला तुमच्या विमा पॉलिसी संदर्भात काही अडचणी निर्माण झाली असेल किंवा, विमा कंपनीकडून योग्य सहकार्य मिळत नसेल, तर तुम्ही सुरुवातीला कंपनीच्या तक्रार निवारण केंद्राकडे तुमची रितसर तक्रार दाखल करा. तक्रारी अर्जासोबत तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करा. यासाठी तुम्हाला संबंधित विमा कंपनीच्या संकेतस्थळावर अथवा विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) यांच्या संकेतस्थळावर तक्रार निवारण अधिकाऱ्याच्या संपर्काची माहिती उपलब्ध होऊ शकते. विमा कंपनीकडून 15 दिवसांच्या आत तुमच्या तक्रारीचे निवारण होणे आवश्यक आहे.
विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाकडे तक्रार
विमा कंपनीच्या तक्रार निवारण केंद्राकडून तुमच्या तक्रारीचे निवारण होत नसेल तर तुम्ही भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDAI) कडे तक्रार नोंदवू शकता. यासाठी तुम्हाला इरडाच्या इन्शुरन्स समाधान(insurance samadhan) या संकेतस्थळावर किंवा आयजीएमएस च्या संकेतस्थळावर ऑनलाईन तक्रार दाखल करता येते तसेच तुम्ही 155255 किंवा 1800 4254 732 या ग्राहकसेवा केंद्राच्या क्रमांकावरही संबंधित कंपनी विरोधात तक्रार दाखल करू शकता. IRDAI कडे तक्रार करण्यापूर्वी तुम्ही संबंधिक विमा कंपनीकडे तक्रार दाखल करणे गरजेचे आहे.
विमा लोकपालांकडे तक्रार
तसेच तुम्ही विमा लोकपालाकंडेही तुमची तक्रार दाखल करू शकता. IRDAI च्या माहिती नुसार भारतात सध्या वेगवेगळ्या ठिकाणी 17 विमा लोकपाल कार्यरत आहेत. त्यांच्याकडे देखील तुम्हाला संबंधित विमा कंपनीकडे तक्रार दाखल करता येईल.
ग्राहक न्यायालयात तक्रार
जर एखाद्या विमाधारकाचे इरडा अथवा विमा लोकपालकांकडून समाधान न झाल्यास त्यास ग्राहक न्यायलायत देखील संबंधित विमा कंपनी विरोधात दाद मागता येते. तुम्ही विमा कंपनीविरुद्ध न्यायालयात कायदेशीर दावा दाखल करू शकता.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            