Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Complaint to Banking Ombudsman: बँकेसंबंधीत तक्रारीवर न्याय मिळत नाही? लोकपालकडे करा ऑनलाइन अर्ज

Complaint to Banking Ombudsman

ऑनलाइन व्यवहार करताना तुमची चूक नसताना खात्यातून पैसे कट केले जातात किंवा तुम्ही जो व्यवहार केला नाही, सुविधा वापरली नाही त्यासाठी चार्ज आकारला जातो. अशा वेळी बँकेच्या कस्टमर केअरला कितीही वेळा फोन केला तरी तोडगा निघत नाही. अनेक वेळा फोन करूनही एकाच प्रकारचे उत्तर येते. अशा परिस्थितीत तुम्ही बँक लोकपालकडे अर्ज दाखल करू शकता.

आर्थिक व्यवहार करताना अनेक वेळा बँक कर्मचार्‍यांची अरेरावी आणि मुजोरपणाला सामोरे जावे लागते. ऑनलाइन व्यवहार करताना देखील तुमची चूक नसताना खात्यातून पैसे कट केले जातात किंवा तुम्ही जो व्यवहार केला नाही, सुविधा वापरली नाही त्याचा चार्ज आकारला जातो. अशा वेळी बँकेच्या कस्टमर केअरला कितीही वेळा फोन केला तरी तोडगा निघत नाही. अनेक वेळा फोन करूनही एकाच प्रकारचे उत्तर येते तेव्हा मात्र, तुम्ही हतबल होता. मेलद्वारे किंवा बँकेच्या वेबसाईटवरुन तक्रार दाखल केली असेल आणि तरीही तोडगा निघाला नसेल तर तुम्ही आरबीआयच्या अंतर्गत येणाऱ्या बँकिंग लोकपालकडे ऑनलाइन (Complaint to Banking Ombudsman) तक्रार दाखल करू शकता.

कोणत्या तक्रारींसाठी लोकपालकडे जाऊ शकता?

पेमेंटमधील दिरंगाई, चेक, ड्राफ्ट्स, बिल पेमेंट्स संदर्भातील तक्रारी

खात्यासंबंधित तक्रारी जसे की ग्राहकाला न सांगता खाते बंद करणे किंवा सेवा नाकारणे

बँकेच्या नियमावलीविरुद्ध ग्राहकांना दंड आकारने, अतिरिक्त सेवादर आकारने

खात्यातील गैरव्यवहार आणि संबंधित व्यवहारांवर बँकेने तोडगा काढला नसेल तर

ग्राहकाला माहिती न देता एखादी सेवा सुरू करून त्यासाठी चार्ज आकारला तर

पैशासंबंधीत अडकलेले व्यवहार

बँक खात्यासंबंधीत तक्रारी

लोकपालकडे तक्रार करण्याआधी -

ग्राहकाने लोकपाल कार्यालयाकडे तक्रार करण्यापूर्वी संबंधित बँकेला लेखी तक्रार केलेली असावी. तसेच 30 दिवसांच्या आत तक्रारीवर कोणताही निर्णय घेतला नाही, दिरंगाई केली किंवा तक्रार अर्ज फेटाळला तर तुम्ही लोकपालकडे अर्ज करू शकता. तसेच बँकेने तुमच्या तक्रारीवर तोडगा काढला. मात्र, तुमचे समाधान झाले नाही तर तुम्ही लोकपालकडे तक्रार करू शकता.

कशी कराल ऑनलाइन तक्रार?

बँकेविरुद्ध तक्रार करण्यासाठी तुम्हाला आरबीआय लोकपालच्या https://rbi.org.in/Scripts/Complaints.aspx या संकेतस्थळावर जावे लागेल. होम पेजवर बँक, नॉन बँकिंग फायनान्शिअल संस्था किंवा प्रिपेड पेमेंट सुविधा पुरवणाऱ्या संस्थेविरुद्ध तुम्ही तक्रार करू शकता असे पर्याय दिसतील. या संकेतस्थळावरून तुम्ही आरबीआय बँकेविरुद्धही तक्रार दाखल करू शकता.

पोर्टलवर तुम्ही मोबाईल नंबर आणि ओटीपीद्वारे लॉगइन होऊ शकता.

त्यानंतर कोणत्या संस्थेविरुद्ध तुम्हाला तक्रार दाखल करायची आहे ते निवडू शकता.

तुमचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता, कोणत्या संस्थेविरुद्ध तक्रार करायची आहे, तक्रारीचा प्रकार त्यासंबंधीत माहिती तुम्हाला जवळ ठेवावी लागेल. 
बँकेबरोबर याआधी केलेला पत्रव्यवहार जसे की, तक्रारीचा मेल, मेजेस, बँकेकडून आलेले उत्तर याचे स्क्रिनशॉट तुम्हाला तक्रार दाखल करताना अपलोड करावे लागतील.

सर्व माहिती जमा सबमिट केल्यानंतर तुमची तक्रार दाखल होईल.

लोकपालकडून तुमची तक्रार संबंधित बँकेला पाठवली जाईल, तसेच ठराविक अवधीत तुम्हाला बँकेकडून तसेच लोकपालकडून उत्तर येईल. 

तुम्ही केलेली तक्रार ट्रॅक करू शकता.

तुम्ही तुमची तक्रार मागेही घेऊ शकता.