देशातील विमान प्रवासाचे दर ठरवण्याची पूर्ण मुभा विमान कंपन्यांना येत्या 31 ऑगस्ट 2022 नंतर मिळणार आहे. यामुळे प्रवाशांना आकृष्ट करण्यासाठी विमान कंपन्यांमध्ये पुन्हा एकदा Price War सुरू होणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
2020 मध्ये कोरोना संसर्गाच्या (Pandemic) सुरुवातीच्या काळात दोन महिने विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर 25 मे 2020 पासून प्रवासी उड्डाणांना काही अटींवर परवानगी देण्यात आली. प्रवास भाड्याची आकारणी विशिष्ट दर पट्ट्यातच (Price Band) केली जावी, याबद्दलची अटदेखील लागू होती. यातील किमान दराची अट लहान विमान कंपन्यांना मदतीची ठरेल. अधिकतम दरावरील निर्बंध भरमसाठ दरवाढीपासून प्रवाशांचा बचाव होण्यासाठी असल्याचे सांगण्यात येत होते.
आता दरावरचे निर्बंध हटल्यानंतर पुढे काय होणार याची चर्चा लगेचच सुरू झाली. 27 महिन्यांत अनेक गोष्टी बदलल्या आहेत. त्यांचा तिकीट दरांवर काय परीणाम होऊ शकतो याबाबत विभिन्न मतं प्रदर्शित होत आहेत.
विमान सेवांमध्ये वाढ
देशांतर्गत विमानसेवा गेल्या 27 महिन्यांत वाढली आहे. कंपन्यांमधली स्पर्धा देखील वाढली आहे. सर्वात महत्त्वाची घटना म्हणजे या काळात एअर इंडियाचे (Air India)खाजगीकरण झाले आहे. नवे व्यवस्थापन (Tata Sons) विमानसेवेला अधिक कार्यक्षम करीत ताळेबंद सुधारण्यासाठी सज्ज आहे. नागरी हवाई सेवा क्षेत्रातील बाजारहिस्सा (market share) वाढवण्यासाठी मोठी स्पर्धा होणार हे उघड आहे. इतर कंपन्यांनीही आपल्या सेवांचा विस्तार केला आहे. आकासा एअर (Akasa Air) या नव्या कंपनीने यंदा ऑगस्टमध्येच उड्डाणे सुरू केली आहेत. भरीस भर म्हणून प्रादेशिक कंपन्या, चार्टर्ड सेवा (charted air service) देणाऱ्या कंपन्यांचा व्यवसाय वाढण्याची शक्यता आहे. या सर्वांचा परिणाम म्हणून तिकिटावरून प्राईज वॉर विमान कंपन्यांत सुरू होऊ शकते का, याकडे लक्ष असणार आहे.
इंधन दरात घसरण
विमानसेवा चालवणाऱ्यांसाठी इंधनाचा (ATF) दर हा खूप महत्वाचा खर्चाचा मुद्दा असतो. भारताला हे इंधन मोठ्या प्रमाणात आयात करावे लागते. या इंधनाचे दर या वर्षात मोठ्या प्रमाणात वाढले होते. मात्र ऑगस्टच्या सुरवातीपर्यंत हे दर काही प्रमाणात कमी झाले आहेत. या कमी झालेल्या दराचा लाभ प्रवाशांपर्यंत पोचवण्याचे ठरवल्यास, तिकीट दर काही प्रमाणात कमी होऊ शकतात. प्रवासी आकर्षित करण्यासाठी तिकिटाची किंमत कमी करण्याचे ठरवल्यास, इंधनाचा दर कमी असणे उपयुक्त ठरते.
आरामासाठी प्रवासात वाढ
साथीच्या काळात जो प्रवास सुरू होता तो बव्हंशी अत्यावश्यक स्वरुपाचा होता. त्यात बिझिनेससाठी प्रवास करणाऱ्याची संख्या होती मात्र यापुढच्या काळात सुट्यांतील आरामासाठी प्रवास (Leisure Travel) करणाऱ्यांची संख्या वाढू शकते. सणासुदीच्या सुट्यांचा काळ आणि त्याला जोडूनच पर्यटकांची (Tourists) संख्या बहरात येण्याचा हंगाम सुरू होत आहे. त्याचा तिकिट दरावर परिणाम होऊ शकतो. प्रवासाच्या ऐन वेळेवर मिळणाऱ्या तिकिटांचे दर अधिक कमी पातळीवर येऊ शकतील अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.
प्रवाशांच्या दृष्टीने तिकिट दर महत्वाचे असले तरी कंपन्यांच्या दृष्टीने यापुढच्या काळात व्यवसाय वाढीला (Business Growth) महत्व असणार आहे. गेल्या काही वर्षांत प्रवासी विमान वाहतूक क्षेत्राने अनेक चढ-उतार सोसले आहेत. पॅन्डेमिक काळात मोठ्या तुटीचा (Loss) सामना त्यांना करावा लागला आहे. त्यानंतर आता व्यवसाय वाढविण्याची मोठी शक्यता या क्षेत्रासाठी निर्माण झाली आहे. तिकीट दरावरील निर्बंध हटवून सरकारने त्याला साह्यभूत असे मोठे पाऊल उचलल्याचे दिसते.
कोरोना साथ आजार प्रसार आणि लॅकडाऊननंतर न्यू नॅर्मल होऊ पाहणा-या अर्थव्यवस्थेत नागरी हवाई वाहतूक सेवाही सहभागी झाली आहे. सलग दोन वर्षानंतरच्या प्रवासबंदीनंतर पर्यटकांकडूनही आता सुट्टीचे नियोजन करून नवनवीन ठिकाणाच्या भेटीचे बेत आखले जाऊ लागले आहेत.