शिक्षणाचे माहेरघर आणि औद्योगिक नगरी असलेल्या पुणे शहराचा विकास झपाट्याने होत आहे. इथल्या रिअल इस्टेट क्षेत्रातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. पुण्यात मागील एक वर्षात घरांच्या किमतीमध्ये 11 टक्क्यांनी वाढ झाली आहे. सद्यस्थितीत पुण्यात प्रति चौरस फूटसाठी 5782 रुपये इतका दर झाला आहे. जो जून 2022 मध्ये 5,208 रुपये प्रति चौरस फूट इतका होता. चांगल्या मागणीमुळे पुण्यातील घरांची सरासरी किंमत वाढली असल्याची माहिती रिअल्टी फर्म गेरा डेव्हलपमेंटच्या अहवालामध्ये देण्यात आली आहे.
पुणेस्थित रिअॅल्टी फर्म गेरा डेव्हलपमेंट्सने त्यांचा द्वि-वार्षिक 'द गेरा पुणे रेसिडेन्शियल रियल्टी रिपोर्ट' प्रसिद्ध केला आहे. गेराने पुणे शहराच्या 30 किमीच्या परिघातील सर्व विद्यमान प्रकल्पांच्या आकडेवारीचे संशोधन करून हा अहवाल सादर केला आहे. नवीन प्रकल्पांचे दर, जुन्या प्रकल्पांचे दर यामध्ये वाढ झाली असल्याची माहिती गेरा डेव्हलपमेंटचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा यांनी दिली आहे.
नवीन प्रकल्पातील किमतीमध्ये वाढ
पुणे शहरात नव्याने सुरू झालेल्या प्रकल्पातील किमती या वर्षी जूनमध्ये 6,499 रुपये प्रति चौरस फूट वर गेल्या आहेत. गेल्या वर्षीच्या हेच दर 6,190 रुपये प्रति चौरस फूट होते. तसेच जे बांधकाम प्रकल्प सुरू आहेत.त्यांच्या नवीन फेजसाठीच्या दरामध्ये देखील 12 टक्क्यांनी वाढ होऊन 5,932 रुपये प्रति चौरस फूट झाले आहेत. जून 2023 मध्ये घरांच्या किमती 3 टक्क्यांनी वाढून 5,539 रुपये प्रति स्क्वेअर फूट झाल्या आहेत. त्या एका वर्षापूर्वी 5,369 रुपये प्रति चौरस फूट इतक्या होत्या.
जानेवारी 2023 ते जून 2023 या कालावधीसाठीचा गेरा पुणे रेसिडेन्शियल रियल्टी अहवाल असे सूचित करतो की, विक्री आणि नवीन प्रकल्पांच्या बाबतीत होणारी वाढ ही बांधकाम इंडस्ट्री चांगल्या स्थितीत आहे. गेल्या 12 महिन्यांत सर्व प्रकल्पांच्या किमती 11% वाढल्या आहेत. तसेच सद्य स्थितीत नवीन प्रकल्प आणि विक्रीमध्ये थोडी घट झाली असल्याचेही या अहवालात म्हटले आहे.