सध्याच्या लाईफस्टाईलनुसार पाहायला गेल्यास, वयाचे 25 वर्ष पूर्ण होत नाही तर आजारांचा शिरकाव होताना दिसत आहे. त्यामुळेच इन्शुरन्स मिळणे अवघड होत आहे. पाॅलिसीबझारच्या डेटानुसार, वयाची 45 वर्ष पूर्ण होण्याआधी 15 टक्के लोकांना आधीपासूनच हृदयविकार, अनकंट्रोल डायबेटीस आणि फुफ्फुसाच्या आजाराने ग्रासले आहे. त्यामुळे त्यांना इन्शुरन्स पाॅलिसी घेण्यात अडथळा येत आहे.
Table of contents [Show]
डायबेटीस रुग्णांची संख्या जास्त
पाॅलिसीबझारने जारी केलेल्या डेटामुळे, धक्कादायक आकडेवारी समोर आली असून आरोग्याच्या दृष्टीने जागरूक होण्याची वेळ आली आहे. कारण, वयाची 45 वर्ष ओलांडत नाही तर एवढे जीवघेणे आजार लोकांच्या शरीरात शिरकाव करत आहेत. त्यामुळे या गंभीर आजारांवर इलाज करण्यासाठी पैसा आवश्यक असतो. तो नसला तर कुटुंबीयांची फरफट ठरलेली आहे. त्यामुळेच इन्शुरन्सची सोय करण्यात आली आहे. मात्र, आधीच असलेल्या आजारामुळे पाॅलिसी मिळणं कठीण झाले आहे. पाॅलिसीबझारच्या आकडेवारीनुसार अनकंट्रोल डायबेटीसमुळे 17 टक्के लोकांना इन्शुरन्स मिळालेला नाही. आजारांची यादी वाढती असून यामध्ये जास्त परिणाम डायबेटीसच्या रुग्णांवर पडलेला दिसून येत आहे.
अन्य आजार या यादीत
या वयाच्या आतील लोकांमध्ये 16 टक्के लोक बीपी, कोलेस्टराॅल, हार्ट ब्लाॅकेज आदी आजाराने ग्रस्त आहेत. तसेच यामध्ये यकृत आजाराने ग्रस्त 13 टक्के लोक आहेत. तर फुफ्फुसांच्या आजारामुळे 12 टक्के लोक ग्रस्त असून त्यांना पाॅलिसी मिळाली नाही. तसेच, यामध्ये कॅन्सरचा ही समावेश असून तो 11 टक्के लोकांना तो झाला आहे. हे आजार असल्यामुळे इन्शुरन्स न मिळण्याच्या टक्केवारीचा आकडा देखील अधिक आहे. त्यामुळे लोकांना विना इन्शुरन्स आजारांवर नियंत्रण ठेवावे लागत आहे. या सर्व आजारांवर लोकांचा वारेमाप पैसा खर्च होत आहे.
नॉन कम्युनिकेबल मृत्यूचे प्रमाण अधिक
या आजारांनी शरीरात एकदा शिरकाव केल्यावर त्यांच्यापासून सुटका मिळवणे अवघड असते. त्यामुळे त्यांच्यावर इलाज करत राहणे हाच एकमेव पर्याय असतो. पण, हे आजार झाल्यास, इन्शुरन्स मिळणे अवघड होते. परिणामी खिशातून पैसा टाकावा लागतो आणि तो मॅनेज करणे मुश्किल होते. विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, जगभरात क्रॉनिक किंवा नॉन कम्युनिकेबल (असंसर्गजन्य) आजार सातत्याने वाढत आहेत. यामुळे एकूण मृत्यूंपैकी 73% टक्के मृत्यू हे या आजारांमुळे झाले आहेत. भारतात नॉन कम्युनिकेबल आजारांमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण 53 टक्के आहे.
आरोग्यासाठी व्यायाम गरजेचा
मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, जगात सर्वाधिक डायबेटीस असलेले लोक भारतात आहेत. यात सुमारे 77 मिलियन लोकांना हा आजार आहे. तर हीच आकडेवारी 2045 पर्यंत वाढून 134 मिलियन होण्याची शक्यता आहे. केवळ डायबेटीसच नाहीतर हृदयविकाराचे रुग्णही भारतात सर्वाधिक आहेत. मंत्रालयाचे म्हणणे आहे की, भारतात हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी आजारामुळे कमी वयातच जीव गमवावा लागत आहे. तसेच, ग्रामीण आणि शहरी भागातही बीपीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी या आजारांवर मात करण्यासाठी लाईफस्टाईलमध्ये सुधारणा करणे आवश्यक असून व्यायाम करण्याला प्राधान्य देणे गरजेचे आहे.