विविध शहरांमध्ये सध्या डेंग्यूची साथ पसरली आहे. डेंग्यूने दगावणाऱ्यांची संख्या वाढत आहे. यामुळे डेंग्यूचा आरोग्य विमा पॉलिसीमध्ये समावेश असतो का याबाबत अनेकांना प्रश्न पडला असेल. आरोग्य विमा पॉलिसी खरेदी करताना नेहमी काही महत्वाचे प्रश्न विचारणे आवश्यक आहे. ज्यामुळे अशा आणिबाणीच्या काळात उपचारांच्या खर्चासाठी धावपळ करावी लागणार नाही.
बहुतांश आरोग्य विमा पॉलिसीमध्ये डेंग्यूवरील उपचारांना विमा संरक्षण दिले जाते. मात्र हे संरक्षण लागू होण्यासाठी सर्वसाधारणपणे आरोग्य विमा पॉलिसीचा 30 दिवसांचा बंधनकारक प्रतीक्षा कालावधी पूर्ण करणे आवश्यक आहे.
डेंग्यूच्या उपचारांसाठी जर विमाधारकाला रुग्णालयात दाखल केल्यास त्याचा खर्च विमा पॉलिसीमध्ये समाविष्ट असतो. त्याशिवाय डॉक्टरांची फी, विविध चाचण्यांचे शुल्क यांचा खर्च विमा पॉलिसीतून दिला जातो. काही विमा पॉलिसींमध्ये रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर सहा महिने संबधित आजाराच्या उपचारांसाठी खर्च दिला जातो. पोस्ट हॉस्पिटलायझेशन एक्सपेन्सेस अशा पॉलिसींमध्ये भरपाई म्हणून दिले जातात. यांचा कालावधी सर्वसाधारणपणे 180 दिवसांचा असतो.
रुग्णालयात उपचार घेत असताना डॉक्टरांचे शुल्क विमा भरपाईमध्ये कव्हर केले जाते. मात्र जेव्हा पेशंट घरी असतो तेव्हा डॉक्टरांची फी पॉलिसीमध्ये मिळेलच असे नाही. याबाबत विमा कंपन्यांचे वेगवेगळे नियम असतात. डॉक्टरच्या शिफारशीवर देखील हे अवलंबून असते. काहीवेळा रुग्णालयात बेड मर्यादित असल्यास किंवा वैद्यकीय कर्मचारी संख्या कमी असल्याने रुग्णाला घरीच उपचार घेण्याचा सल्ला डॉक्टर देतात. अशावेळी उपचारांचा खर्च हेल्थ इन्शुरन्समधून दिला जातो.
दरम्यान, हेल्थ इन्शुरन्सचे नुतनीकरण करताना किंवा नव्याने पॉलिसी खरेदी करताना डेंग्यू, इतर संसर्गजन्य आजारांवर विमा संरक्षण मिळते हे विचारणे आवश्यक आहे. पॉलिसी घेण्यापूर्वी कोणत्या दुर्धर आजारांना विमा संरक्षण देण्यात आले आहे याचा विचार करणे आवश्यक आहे. त्याशिवाय किमान प्रतिक्षा कालावधी किती दिवसांचा आहे. हॉस्पिटलमधील रुमची भाडे मर्यादा, मेडिकल टेस्टसाठी खर्च, ओपीडी खर्च, स्पेशलिस्ट डॉक्टरांची फी अशा खर्चांचा समावेश आहे का याची खातरजमा करणे आवश्यक आहे.