शेती व्यवसाय करत असताना अनेकवेळा पैशाची गरज भासते. केवळ शेतीची मशागत केल्याने शेती उत्पादनात वाढ होत नाही. उत्पादन वाढीसाठी शेतीशी निगडीत इतरही गोष्टींसाठी मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. जसे की जमिनीची सुधारणा, पाण्याची सोय, पाईप लाईन या सारख्या अत्यावश्यक गोष्टीसाठी पैसा खर्च करणे गरजेचे ठरते. यासाठी एचडीएफसी (HDFC) बँकेकडून शेतकऱ्यांसाठी किसान शक्ती कर्ज (Kisan Shakti Loan) योजना सुरू करण्यात आली आहे.
किसान शक्ती कर्ज Kisan Shakti Loan
एचडीएफसी बँकेकडून शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या प्रकारची कर्जे दिली जातात. त्यामध्ये HDFC किसान क्रेडिट कार्ड लोन, लघू कृषी उद्योग, ट्रॅक्टर कर्ज या प्रमाणेच किसान शक्ती कर्ज देखील दिले जाते. किसान शक्ती कर्ज योजनेतून हे प्रामुख्याने शेती व्यतिरिक्त अतिरिक्त उत्पान्नाचे स्त्रोत असणाऱ्यांना कर्ज उपलब्ध करून दिले जाते. अशा कर्जदार व्यक्तीस बागायती पिकांच्या लागवडीसाठी, दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी, अन्न प्रक्रिया उद्योगासाठी तसेच विहिरीचे खोलीकरण करण्यासाठी किंवा विहिरीचे रिंग टाकून बांधकाम करणे, बोअरवेल पाडणे, पाइपलाइन, ठिबक सिंचन, शेतीची अवजारे खरेदी आणि दुरुस्ती करणे इत्यादीसाठी कर्ज उपलब्ध करून दिले जाते.
कर्जाची मुदत?
किसान शक्ती कर्ज हे निश्चित कालावधीच्या मुदतीसाठी दिले जाते. काही वेळा अर्जदाराच्या आवश्यकतेनुसार आणि पात्रतेनुसार. बँकेकडून कर्जाची मूदत आणि रक्कम ठरवली जाते. यासाठी आकारण्यात येणारा व्याजदर सरासरी 10.77 इतका अथवा कर्ज प्रकारानुसार निश्चित करण्यात येतो. याबाबत कर्ज प्रकरणावेळी बँकेकडून खात्री करणे गरजेचे आहे.
मोठ्या शेतकऱ्यांनाच लाभ
किसान शक्ती कर्जामुळे शेतकऱ्यांना शेती उत्पादन वाढवण्यासाठी जो अतिरिक्त खर्च आवश्यक आहे. त्यासाठी एचडीएफसीकडून कर्ज उपलब्ध केले जाते. त्यामुळे शेतीच्या विकास करण्यामध्ये बाधा येत नाही. यामुळे शेती उत्पादनामध्ये वाढ होण्यास मदत होते. तसेच मोठ्या शेतकऱ्यांकडे खेळते भांडवल तयार होते, शेती विकासासह इतर व्यवसायासाठी कर्जाचा लाभ घेता येतो. मात्र, या किसान शक्ती कर्ज सर्व सामान्य शेतकऱ्यांना उपलब्ध होत नाही. बँक किसान शक्ती कर्ज हे केवळ ज्या शेतकऱ्यांच्या उत्पन्नाचे अतिरिक्त स्रोत आहेत अशाच शेतकऱ्यांना या कर्जाचा फायदा घेता येतो. त्यामुळे सर्व सामान्य किंवा अल्पभूधारक शेतकरी हे कर्ज घेण्यास पात्र ठरत नाहीत, ही या कर्ज प्रकाराची एक काळी बाजू ठरते.