१९७१ साली जुन्या दिल्लीतील चांदणी चौकामध्ये भागीरथ पॅलेस येथे किमतराय गुप्ता यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तूचे एक छोटंस दुकान होत. केबल, स्विचबोर्ड, बल्ब विक्रीचा त्यांचा व्यवसाय होता. दहा वर्ष दुकान चालवल्यानंतर काहीतरी नवं करण्याची उर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. इलेक्ट्रिक वस्तूंच्या बाजारपेठेचा संपूर्ण आवाका त्यांना आला होता. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू स्वत:च तयार करण्याचा विचार त्यांच्या डोक्यात घोळत होता. पुढे ह्या एका विचारातून हॅवल्स ब्रँड उभा राहिला. तो कसा पाहूया या लेखातून.
हवेली राम गांधींपासून हॅवल्स( Haveli Ram Gandhi )
हॅवल्स कंपनीचे खरे मालक हवेली राम गांधी होते. या कंपनीच्या उत्पादनांचे वितरक किमत राय गुप्ता होते. मात्र, काही कारणास्तव हॅवल्स कंपनी विक्रीस निघाली. किमतराय गुप्ता स्वत: कंपनी सुरू करण्याच्या विचारात होतेच. किमतराय यांनी संधीचा फायदा उठवत हॅवल्स कंपनी विकत घेतली. हॅवल्स हे कंपनीचे नावही अंत्यत आकर्षक विदेशी वाटते होते. त्याचाही कंपनीला फायदा झाला. त्यावेळी हॅवल्स कंपनी दिवे, घरगूती उपकरणे, केलब्स, स्वीचगिअर, बोर्ड, कंपन्यांना लागणारी वीजेवरची उपकरणे निर्मिती करत होती. मात्र, त्यास म्हणावा असा प्रतिसाद नव्हता. किमतराय यांनी आणखी गुंतवणूक करून निर्मिती प्रकल्प उभा केला आणि उत्पादनाच्या गुणवत्तेवर विशेष लक्ष दिले.
दिल्लीच्या बाजारपेठेतून पोहचला भारतभर
काही अवधीतच हॅवल्स ब्रँडची उत्पादने नागरिकांच्या पसंतीस उतरू लागली. दिल्लीमध्ये त्यांच्या उत्पादनांना मोठी मागणी वाढली. ९० च्या दशकात नुकतेच चिनी माल भारतीय बाजारपेठेत येण्यास सुरुवात झाली होती. कमी किमतीत, हलक्या दर्जाचा चिनी माल भारतीयांना पसंतीस पडू लागला. त्याचा परिणाम कितीतरी भारतीय इलेक्ट्रॉनिक्स कंपन्या बंद पडल्या. भारतीय मालाची उत्पादन किंमत चिनी मालापेक्षा जास्त होती. त्यावर हॅवल्स कंपनीने डगमगून न जाता काही महत्त्वाचे निर्णय घेतले. नवनवीन उत्पादने बाजारात आणण्यासाठी रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर सुरू केले. तसेच उत्पादनांची गुणवत्ता किंचितही कमी होऊ दिली नाही. त्यामुळे काही कालावधीतच कंपनीचं बाजारात नाव झालं.
हळुहळू कंपनीने व्यवसायात चांगला जम बसवला. देशभर वितरकांचे जाळे निर्माण केले. कंपनीने दिल्ली आणि बिदली येथे आणखी दोन निर्मिती प्रकल्प सुरू केले. व्यवसायात वृद्धी होत असताना कंपनीला स्पर्धेलाही सामोरं जावे लागले. तोट्यात असलेल्या मात्र, उत्तम कंपन्या शोधून त्या विकत घेण्याचा सपाट हॅवेल्सने लावला. तोट्यातील कंपन्याना विकत घेवून त्यांना काही दिवसांतच नफ्यात आणण्याची किमया किमतराय यांनी करुन दाखवली.
आंतरराष्ट्रीय कंपन्या घेतल्या ताब्यात(Havells acquired international brands)
१९९८ ते २००२ दरम्यान हॅवल्स कंपनीने कॅबट्री, स्टॅन्डर्ड अँड ड्यूक इलेक्ट्रिक्स कंपनी विकत घेतली. त्यानंतर काही दिवसांनी कंपनीने लॉय्ड आणि रिओ अँड प्रॉम्पटेक ही कंपनी विकत घेतली. सोबतच कंपनी नवनवीन घरगूती उपकरणे बाजारात आणण्यासाठी रिसर्चवर भर देऊ लागली. त्यातूनच सीएफएल बल्ब, डेकोरेटिव्ह लाइट सेगमेंट, फॅन अशी अनेक उत्पादने बाजारात आणली. ही सर्व उत्पादने ग्राहकांच्या पसंतीस पडत होती. स्लेवानिया ही एलईडी बल्ब निर्मिती करणारी कंपनी हॅवल्सने ताब्यात घेतली आहे.
११ उत्पादन प्रकल्प आणि सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी
हॅवल्स कंपनीचे देशभरात सुमारे ११ निर्मिती प्रकल्प असून सहा हजारांपेक्षा जास्त कर्मचारी काम करत आहेत. ५० पेक्षा जास्त देशांमध्ये कंपनी व्यापार करते. ग्राहकांना उत्पादनासंबंधी मदत करण्यासाठी कंपनीने सर्वप्रथम 'डोअर स्टेप सर्व्हिस' ही संकल्पना आणली. कंपनीची उत्पादने विकत घेण्यासाठी 'वन स्टॉप शॉप' सुरू करण्याची कल्पनाही यशस्वी झाली. सध्या देशात अडीचशे पेक्षा जास्त असे शोरुम्स कंपनीने सुरू केले आहे. तसेच वितरकांचे जाळे देशाच्या कानाकोपऱ्यात पसरले आहे.