चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत 80 कोटींचा नफा मिळाल्यानंतर शेअर मार्केटमध्ये आज गुरुवारी हॅटसन अॅग्रोचा शेअर 12% ने वधारला. आजच्या तेजीने हॅटसन अॅग्रोची मार्केट कॅप 23435 कोटींपर्यंत वाढली. कंपनीने प्रती शेअर 6 रुपयांचा डीव्हीडंड जाहीर केला आहे.
दूध, दुग्धजन्य पदार्थ आणि आयस्क्रीम निर्मितीमधील आघाडीची कंपनी असलेल्या हॅटसन अॅग्रो प्रॉडक्ट्सला 80.2 कोटींचा निव्वळ नफा झाला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा नफ्यात 54.2% वाढ झाली. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत कंपनीला 52 कोटींचा नफा झाला होता.
एप्रिल ते जून या तिमाहीत कंपनीच्या एकूण महसुलात वाढ झाली असून कंपनीला 2150.6 कोटी मिळाले. कंपनीला 237.9 कोटींचा करपूर्व नफा मिळाला आहे. गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीला 178.2 कोटींचा करपूर्व नफा मिळाला होता. यंदाच्या तिमाहीत कंपनीच्या मार्जिनमध्ये देखील सुधारणा झाली आहे. जून 2023 अखेर कंपनीचे मार्जिन 11.1% इतके वाढले आहे.
या कामगिरीचा फायदा आज शेअरला झाला. हॅटसन अॅग्रोचा शेअर आजच्या सत्रात 12.19% ने वधारला होता. तो 1094.90 रुपयांपर्यंत गेला. दिवसअखेर हॅटसन अॅग्रोचा शेअर 74.85 रुपयांच्या वाढीसह 1050.70 रुपयांवर स्थिरावला. आजच्या सत्रात 32 शेअर्सचे ट्रेडिंग झाले. वर्ष 2023 मध्ये हॅटसन अॅग्रोचा शेअर 17% ने वधारला आहे. पहिल्या तिमाहीत ईपीएस रेशो 3.60 रुपये प्रति शेअर इतका आहे. त्याआधीच्या वर्षातील पहिल्या तिमाहीत तो 2.36 रुपये इतका होता.
हॅटसन अॅग्रोच्या संचालक मंडळाने प्रति शेअर 6 रुपयांचा डीव्हीडंड जाहीर केला आहे. यासाठी 27 जुलै 2023 ही रेकॉर्ड डेट ठेवण्यात आली आली. 18 ऑगस्ट 2023 पूर्वी अंतरिम लाभांश गुंतवणूकदारांना अदा केला जाईल, असे कंपनीने म्हटले आहे.
दक्षिण भारतातून सुरवात करणाऱ्या हॅटसन अॅग्रोने तामिळनाडू, आंध्र प्रदेश, तेलंगणा, महाराष्ट्र, पॉंडेचरी, केरळ, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, छत्तीसगड आणि ओदिशा या राज्यात विस्तार केला आहे. हॅटसन अॅग्रोचे देशभरात 20 प्लान्ट आहेत.