आफ्रिकेतील सुदान देशात सध्या गृहयुद्ध सुरू आहे. देशातील लष्कर आणि निमलष्करी दले एकमेकांसमोर उभी ठाकली असून शहरे, ग्रामीण भाग आणि घनदाट जंगलात चकमकी सुरू आहे. यामध्ये हजारो निष्पाप सुदानी नागरिकांचा मृत्यू झालाय. मात्र, येथील गृहयुद्धाचा परिणाम लवकरच जगभर होण्याची शक्यता आहे. शीतपेये बनवणाऱ्या पेप्सी, कोकाकोला या कंपन्यांना या वादाचा मोठा फटका बसू शकतो. सोबतच इतरही अनेक अन्नपददार्थ बनवणाऱ्या कंपन्यांना कच्च्या मालाचा तुटवडा भासू शकतो.
शीतपेय, चॉकलेट, कॉस्मेटिकमध्ये वापर
सध्या उन्हाळा सुरू आहे. पेप्सी, कोकाकोला या कंपन्यांसह इतरही अनेक कंपन्यांची फेसाळणारी शीतपेये तुमची तहान भागवत असतील. हे शीतपेय तयार करताना त्यात डिंक वापरला जातो. याचे सर्वाधिक उत्पादन सुदान देशात घेतले जाते. gum arabic असे डिंक मिळणाऱ्या झाडाचे नाव आहे. सोबतच चॉकलेट, सौंदर्यप्रसाधने निर्मितीमध्येही हा डिंक वापरला जातो. जगभरात 70% डिंकाचा पुरवठा सुदानमधून होतो. देशातील साहेल या भौगोलिक पट्ट्यात gum arabic चे उत्पादन घेतले जाते. या उत्पादनाऐवजी इतर पर्यायी पदार्थही वापरला जातो. मात्र, त्याचे प्रमाण नगण्य आहे.
बाभळीच्या झाडासारखेच हे एक झाड आहे. शीतपेये बनवणाऱ्या कंपन्या डिंक सुदानमधून मोठ्या प्रमाणात आयात करतात. मात्र, सध्या गृहयुद्ध सुरू असल्याने निर्यातीवर परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांपासून कंपन्यांनी सहा महिने पुरेल एवढा डिंक आयात करुन ठेवला आहे. मात्र, जर गृहयुद्ध लवकर संपले नाही तर शीतपेय निर्मितीत अडथळा येऊ शकतो.
अन्नपदार्थ निर्मिती करणाऱ्या जगभरातील कंपन्यांना चिंता
याआधी ज्या हिंसक चकमकी व्हायच्या त्या दार्फर या दुर्गम भागात होत असत. मात्र, यावेळी सुदानची राजधानमी खार्टुम चकमकींमुळे धगधगत आहे. संपर्कव्यवस्था आणि वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाल्याने एफएमसीजी क्षेत्रातील कंपन्यांना चिंता वाटत आहे. जर गृहयुद्ध खूप काळ सुरू राहिले तर दुकांनातून तुमची आवडती अनेक उत्पादने दिसेनाशी होतीत, असे गम अरेबिक या डिंकाचा पुरवठा करणाऱ्या केरी ग्रुपचे अधिकारी रिचर्ड फेनगन यांनी म्हटले.
110 कोटी डिंकाची बाजारपेठ
जगभरात दरवर्षी एक लाख वीस हजार टन गम अरेबिक या डिंकाचे उत्पादन घेतले जाते. 110 कोटी डॉलरची ही बाजारपेठ असून आफ्रिकेतील 500 मैलाच्या पट्ट्यात याचे उत्पादन होते. इथिओपिया, चाड, सोमालिया आणि इर्ट्रा या देशातही डिंकाचे काही प्रमाणात उत्पादन घेतले जाते. डिंकाचा व्यापार पूर्णपणे ठप्प झाल्याचे अनेक पुरवठादारांनी रियटर्स या वृत्तवाहिनीला सांगितले. रस्ते बंद असल्यामुळे सुदानाच्या ग्रामीण भागातून डिंकाचा पुरवठा करणे अवघड झाल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.
गृहयुद्धामुळे बंदरे आणि इतर प्रवासी मार्ग नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याकरिता वापरण्यात येत आहेत. मुंबईतील व्यापाऱ्यांनीही पुरवठ्यावरून चिंता व्यक्त केली आहे. परिस्थिती कधी निवळेल याबाबत काहीही अंदाज नाही, असे मुंबईतील जिनेश दोषी या डिंक आयात करणाऱ्या व्यापाऱ्याने म्हटले.