केंद्र सरकारने कॅसिनोवर जीएसटी लागू केल्यानंतर पहिलाच झटका भारतातील सर्वात मोठी कॅसिनो ऑपरेटर असलेल्या डेल्टा कॉर्पला बसला आहे. गोव्यातील प्रसिद्ध कॅसिनो ऑपरेटर डेल्टा कॉर्पला 16800 कोटींचा जीएसटी भरण्याची नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटीशीचे पडसाद आज सोमवारी 25 सप्टेंबर 2023 रोजी शेअर मार्केटमध्ये उमटले. आज डेल्टा कॉर्पचा शेअर 20% कोसळला. यामुळे गुंतवणूकदारांचे 850 कोटींचे नुकसान झाले.
डेल्टा कॉर्प भारतातील सर्वात मोठी कॅसिनो ऑपरेटर आहे. डेल्टा कॉर्प आणि तीच्या इतर कंपन्यांनी जीसएटी आणि सर्व्हिस टॅक्स द्यावा लागणार आहे. भारतात 1 जुलै 2017 रोजी जीएसटी लागू झाला. तेव्हापासून मार्च 2022 पर्यंत डेल्टा कॉर्पला जीसएटी भरावा लागणार आहे.
गेल्या आठवड्यात हैदराबादमधूल जीएसटी इंटेलिजन्सने डेल्टा कॉर्पला 16800 कोटींची कर भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे. जीएसटी विभागाच्या नोटीशीनुसार डेल्टा कॉर्पला सीजीएसटी, गोवा सरकारचा एसजीएसटी तसेच सर्व्हिस टॅक्स भरावा लागणार आहे. (GST Demand Notice received by Delta Corp)
जीएसटी विभागानुसार डेल्टा कॉर्पने 11140 कोटी थकवले आहेत. त्याशिवाय कॅसिनो डेल्टीन डेंगझोन, हायस्ट्रीट क्रूझेस आणि डेल्टा प्लेझर क्रुझेस या कंपन्यांना एकूण 5862 कोटी रुपये कर थकबाकी भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
गेल्या महिन्यात संसदेने कॅसिनोवर 28% जीएसटी लागू करण्याच्या कर सुधारणेला मंजुरी दिली होती. त्यानंतर डेल्टा कॉर्पला कर भरण्याची नोटीस पाठवण्यात आली आहे.
दरम्यान, 16800 कोटींच्या नोटीशीमुळे कंपनीची अडचण वाढली आहे. यामुळे कंपनीच्या महसुलावर परिणाम होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांनी आज डेल्टा कॉर्पच्या शेअर्सची चौफेर विक्री केली. डेल्टाचा कॉर्पचा शेअर आज इंट्रा डेमध्ये 20% कोसळला होता. तो 140.20 रुपयांच्या नीचांकी पातळीपर्यंत घसरला होता.
आज बाजार बंद होताना डेल्टा कॉर्पचा शेअर 143.00 रुपयांवर स्थिरावला. त्यात 18.40% घसरण झाली. या पडझडीत डेल्टा कॉर्पचे बाजार भांडवल 3850 कोटींपर्यंत खाली आहे. गुंतवणूकदारांचे 842.69 कोटींचे नुकसान झाले. आजच्या सत्रात 70 लाख शेअर्समध्ये ट्रेडिंग झाले. शुक्रवारी 22 सप्टेंबर 2023 रोजी डेल्टा कॉर्पचा शेअर 175.25 रुपयांवर बंद झाला होता.
वर्षभरात डेल्टा कॉर्पचा शेअर 31% घसरला
जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत जेव्हा कॅसिनोवर जीएसटी लागू करण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. तेव्हापासून डेल्टा कॉर्पचा शेअर दबावात होता. मागील वर्षभरात डेल्टा कॉर्पचा शेअर 30.91% घसरला आहे. डेल्टा कॉर्पचा एक वर्षाचा beta 1.4 आहे जो सर्वाधिक अस्थिर मानला जातो.